Lonavala Lions Point Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Lions Point Suicide Incidents: लोणावळ्यातील लायन्स पॉईंटवर वाढत्या आत्महत्यांची छाया; पर्यटनावर परिणामाची भीती

१५ दिवसांत दोन घटना; सुरक्षिततेसाठी रेलिंग, सीसीटीव्ही व सुरक्षारक्षकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: बारमाही पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला लोणावळा शहरातील लायन्स पॉईंट सध्या चिंतेचा विषय ठरू लागला आहे. मागील पंधरा दिवसांत या ठिकाणी दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्याने पर्यटनस्थळाची ओळख ‌‘सुसाईड पॉईंट‌’अशी होऊ लागल्याची खंत व्यक्त होत आहे.

लोणावळा शहरापासून काही अंतरावर हातवन व कुरवंडे गावांच्या सीमेवर वसलेला लायन्स पॉईंट हा वर्षभर पर्यटकांनी गजबजलेला मुख्य पिकनिक स्पॉट आहे. दूरवर पसरलेले पठार, खोल दरी, वर्षभर असलेला गारवा, वाऱ्याच्या झुळका आणि धुकेमय वातावरण यामुळे येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. भविष्यात येथे जागतिक कीर्तीचा ग्लास स्कायवॉक प्रकल्प उभारण्याचेही नियोजन आहे. मात्र, अलीकडील आत्महत्यांच्या घटनांनी या निसर्गरम्य ठिकाणावर काळी छाया पडली आहे.

आयटी अभियंत्याची दरीत उडी

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका आयटी अभियंत्याची कार दरीच्या काठावर संशयास्पद अवस्थेत आढळली होती. लोणावळा ग््राामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शिवदुर्ग रेस्क्यू टीमने शोधमोहीम राबवली. सुमारे 250 फूट खोल दरीत वीरेंद्र सिन्हा (वय 32, रा. पुणे) यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासानुसार आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी दहा दिवसांपूर्वी मुंबईतील एका तरुणीनेही याच ठिकाणी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मागील काही वर्षांतही अशा अनेक घटना घडल्या असल्याने स्थानिकांमध्ये तीव चिंता व्यक्त होत आहे.

पर्यटनावर परिणाम होण्याची भीती

वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे लायन्स पॉईंटचे नाव बदनाम होत असून, त्याचा थेट परिणाम लोणावळ्याच्या पर्यटनावर होऊ शकतो, अशी भीती स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक व्यक्त करत आहेत. पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यासाठी ही परिस्थिती धोकादायक मानली जात आहे. निसर्गरम्य सौंदर्यामुळे प्रसिद्ध असलेला लायन्स पॉईंट पुन्हा सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जावा, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उपाययोजनांची मागणी

  • दरीकाठावर मजबूत संरक्षक रेलिंग उभारणे

  • कायमस्वरूपी सुरक्षारक्षक तैनात करणे

  • संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे

  • इशारा फलक व हेल्पलाईन क्रमांक लावणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT