जिल्ह्यात महिलांसाठीच्या स्वतंत्र रुग्णालयाचा अभाव Pimpri
पिंपरी चिंचवड

Pimpri News: जिल्ह्यात महिलांसाठीच्या स्वतंत्र रुग्णालयाचा अभाव

पुणे जिल्ह्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र असे रुग्णालय अद्याप नाही.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: धावपळीच्या युगामध्ये महिलांना आरोग्याचा समस्यांनी ग्रासले आहे. पण महिला खुल्या मनाने आपल्या भावना कुटुंबात अथवा नातेवाईकांना सांगत नाहीत. त्यामुळे कॅन्सर, मासिकपाळीसंदर्भात तसेच इतर रोगाचे प्रमाण महिलांमध्ये वाढत आहे. यासाठी जिल्हास्तरावर महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची आवश्यकता आहे; मात्र पुणे जिल्ह्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र असे रुग्णालय अद्याप नाही.

आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी आणि विशेषतः महिलांच्या आरोग्य गरजांकडे लक्ष देण्यासाठी शासनाकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील अमरावती, नांदेड, अकोला, गोंदिया, धाराशीव, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यात महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय आहे; तसेच हिंगोली, यवतमाळ, सांगली, सातारा, धुळे व रायगड याठिकाणी प्रस्तावित आहेत. (Latest Pimpri News)

महिलांच्या आरोग्य सुविधांना प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांना प्रसूती, स्त्रीरोग, आणि इतर वैद्यकीय समस्यांसाठी अत्याधुनिक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या रुग्णालयांमध्ये जावे लागते.

ज्यामुळे वेळ आणि खर्च वाढतो. यासाठी रुग्णालयात महिलांसाठी विशेषतः गरोदर माता, नवजात बालके आणि स्त्रीरोगांशी संबंधित समस्यांसाठी उपचार प्रदान करेल. तसेच अत्याधुनिक उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि प्रशिक्षित कर्मचारी असलेल्या रुग्णालयात महिलांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होतील.

विविध आजारांच्या रुग्णांसाठी वेगवेगळे कक्ष

मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये प्रसुतीकक्ष किंवा महिलांसाठी एकच विभाग असतो. यामध्ये विविध आजाराने त्रस्त महिलांना दाखल करण्यात येते. खरे तर हा गरोदर आणि प्रसूती झालेल्या महिलांसाठीची विशेष व्यवस्था असते. यामध्ये तरुणी, मध्यमवयीन, वयोवृद्ध किंवा गर्भाशयासंबंधीत आजार किंवा इतर कोणत्याही आजाराच्या महिलांना याच कक्षामध्ये ठेवण्यात येते. महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी दाखल झालेल्या महिलांना वेगळे ठेवण्याची सोय होणार आहे.

एकल महिलांसाठी उपयुक्त

समाजामध्ये काही घटस्फोटीत, विधवा, अविवाहीत अशा एकल महिला असतात. या महिलांच्या आाजारांची वेगवेगळी कारणे असू शकतात. या महिलांना गरोदर अथवा प्रसूती झालेल्या महिलांमध्ये ठेवल्यानंतर त्यांना ते वातावरणामध्ये राहणे अवघड होते.

एकाच छताखाली सुविधा

स्वतंत्र रुग्णालयात कुमारी अवस्थेपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंतच्या सर्व समस्या आणि आजारांचे निदान व उपचार केले जातील. मुलींच्या मासिक पाळीच्या समस्या, मासिक पाळी जाण्याचा काळ, रजोवृत्ती झाल्यानंतरचे महिलांचे आरोग्य तसेच इतर शस्त्रक्रियादेखील एकाच छताखाली उपलब्ध असतात.

महिलांसाठी समुपदेशन केंद्र

जिल्ह्यातील मुला-मुलींच्या प्रमाणात मोठी तफावत असल्यामुळे मुली अथवा महिलांवर होणार्या अत्याचारात वाढ होत आहे. यासाठी स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी महिला रुग्णालयात एक समुपदेशन केंद्र स्थापन केले आहेत. मासिक पाळीची समस्या, योनी मार्गाचे कॅन्सर असतात, महिलांना मानसिक ताण येतो. त्यासाठी समुपदेशन करणे गरजेचे आहे.

सामान्यत: प्रत्येक रुग्णालयात महिलांसाठी प्रसुतीकक्ष असतो. यामध्येच सर्व प्रकारच्या आजारांनी ग्रस्त महिलांना याठिकाणीच उपचार दिला जातो. त्यामुळे इतर आजारांच्या महिलांना येथे संकोच वाटतो आणि सुविधा देतानादेखील अडचणी येतात. स्वतंत्र रुग्णालयामुळे किशोरवयीन ते वयोवृद्ध महिलांसाठी एकाच छताखाली उपचार मिळेल.
- डॉ. महेश असलकर (स्त्रीरोग तज्ज्ञ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT