तळेगाव स्टेशन: इंदोरीजवळील कुंडमळा येथील पूल 15 जून 2025 रोजी कोसळला होता. या वेळी पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. या घटनेला आता एक वर्ष होत आले; परंतु अद्याप संबंधित प्रशासनाने येथील पूल उभारला नाही. यामुळे पावसाळ्यात कुंडमळा येथे पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होणार आहे. हा पूल कधी होणार, असा प्रश्न पर्यटक व स्थानिक नागरिक करत आहेत.
सदर पुलाचे काम नोव्हेंबर 2025 च्या दरम्यान सुरू करण्यात आले होते. परंतु, डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) यांनी त्यांच्या जागेवर 100 मीटरचे आत काम करता येणार नाही, असे लेखी सांगितल्याने ते काम थांबविण्यात आले आहे. पुलासाठी पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरू आहे, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. यामुळे पुलाच्या कामासाठी खणलेले खड्डे बुजविण्यास सुरवात झालेली आहे. यामुळे सध्या नागरिकांना, वाहनचालकांना इंदोरी, माळवाडी, भेगडेवाडी देहू येथून प्रवास करावा लागत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचा वेळ आणि अंतर वाढल्याने खर्चदेखील वाढला आहे.
जीव धोक्यात घालून प्रवास
अनेक चारचाकी, दुचाकी चालक वाहत्या पाण्याच्या प्रवाहाच्या बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने प्रवास करतात. पावसाळ्यात अथवा दररोज अशा पद्धतीने प्रवास करणे जीवावर बेतू शकते. पावसाळ्यात या भागात सतत पाऊस सुरू असतो. यामुळे पाण्याची पातळी सातत्याने कमी जास्त होते. अशा वेळी या बंधार्ऱ्यावरून प्रवास करणे धोक्याचे होऊ शकते. यामुळे येथील धोकादायक प्रवास थांबविणे गरजेचे आहे.
कुंडमळा येथील पूल कोसळून एक वर्ष होत आहे; परंतु अद्याप शासनाने येथील पूल उभारला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना काही किलोमीटरचा प्रवास सध्या 12 ते 15 किलोमीटरचा वळसा घालून करावा लागत आहे. परंतु, काही तरुण व नागरिक तसेच पर्यटक या बंधार्ऱ्यावरून धोकादायक पद्धतीने प्रवास करत आहेत. यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.सागर भेगडे, स्थानिक रहिवासी
डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) यांनी त्यांचे नियमानुसार काम थांबविले आहे. पुलासाठी पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. जागा उपलब्ध झाली की काम सुरू करण्यात येईल.धनराज दराडे, उपअभियंता, पीडब्ल्यूडी, वडगाव मावळ