देहूगाव: किवळे-रावेतच्या के-विले हौसिंग सोसायटीजवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेने मनमानी करून कचरा डेपो उभारण्याचा घाट घातला आहे. त्याला या भागात राहणार्या सदनिकाधारक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हा कचरा डेपो तत्काळ इतर ठिकाणी हलवावा, असे पालिका प्रशासनाला अनेकवेळा लेखी निवेदने दिले आहेत, आंदोलने करण्यात आली; परंतु पालिका प्रशासनाने आंदोलकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या कचरा डेपोमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे त्रस्त रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली घेतली असून, पिंपरी-चिंचवड महापालिका विरोधात याचिका दाखल केली आहे. जबरदस्तीने लादलेला कचरा संकलन डेपो तिथून हाटवला जाईल, असा ठाम विश्वास अॅड. डॉ. अशिष देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. किवळे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Latest Pimpri News)
या कचरा संकलन डेपोबाबत महापालिकेने कोणत्याही परवानग्या घेतल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालय म्हणते की, पब्लिक इफेक्ट होत असले तर त्यांच्या पत्राची दखल घ्याला पाहिजे, ऑर्डनस फॅक्टरी देहुरोडमध्ये काही इफेक्ट झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण किवळेला भोगावा लागेल.
आमदार, खासदार यांचे पण पालिकेने ऐकले नाही. नागरिकांनी आपल्या आयुष्यातील कमाईतून सदनिका घेतल्या आहेत. घरे बांधली आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा कचरा प्रकल्प योग्य नाही.
पालिका आयुक्तांची बदली होत नसल्याने ते याच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. प्रदूषण मंडळाचे एक खाते पालिकेत पण आहे. कचरा डेपो म्हणजे जगातील सर्वात मोठा घातक विषाणू आहे. मी म्हणेल तोच कायदा, असा प्रकार पालिकेत सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी धर्मपाल तंतरपाळे, निलेश तरस, शाम भोसले, राजेंद्र तरस, सुदाम तरस, प्रवीण पाटील, सुधाकर पाटील, सुनील प्रधान, कुंडलिक आम्ले उपस्थित होते.
किवळे कचरा संकलन डेपोसाठी आयुक्त जिद्दीला पेटले आहेत. शहर अभियंता पर्यावरण संजय कुलकर्णी हे डेपो तिथेच होणार असे बोलत आहेत. या कचरा संकलन डेपोला ऑर्डनस फॅक्टरी व नागरिकांचा तीव्र विरोध आहे. पण अधिकार्यांना त्याचे काहीही देणे घेणे नाही.- धर्मपाल तंतरपाळे, संस्थापक अध्यक्ष फुले आंबेडकर विचार मंच
पालिका अधिकार्यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता, चुकीच्या पद्धतीने या प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीने देखील पालिकेला पत्र दिले की, सुरक्षिततेच्या दृष्टीने हे योग्य नाही. आयुक्त समक्ष भेटले मात्र दोन मिनिटेही बोलले नाहीत. बिल्डर फ्लॅट विकून मोकळा झाला आहे. कॅन्टोन्मेंटच्या जागा पालिकेने काही डेव्हलप केल्या आहेत, पालिका अधिकारी संजय कुलकर्णी हे नागरिकांशी दादागिरीची भाषा करीत आहेत. जी आरक्षण टाकण्यात आली आहेत, ती नागरिकांना विचारात न घेता टाकण्यात आली आहेत.- शाम भोसले, नागरिक