पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मुकाई चौकासमोरील किवळे परिसरात असलेल्या बापदेव महाराज उड्डाण पुलाखाली वाहनचालकांना दररोज सायंकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीने वाहनचालक तसेच स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहनचालकांना तासन्तास रांगेत अडकून पडावे लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे आणि अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाहतूक पोलिस घटनास्थळी असतानाही या समस्या उद्भवत आहेत.
किवळे येथील उड्डाण पुलाखालील रस्ता हा पुणे-मुंबई महामार्ग तसेच पुणे-बंगळुरू महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. याशिवाय परिसरातील वाहनांची येथून मोठी वर्दळ असते. स्थानिक नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर ये-जा या मार्गावरून सुरू असते; तसेच मुकाई चौकात बस टर्मिनल असल्याने येथूनच पीएमपी गाड्या ये-जा करतात.
पोलिस असूनही कोंडी का ?
उड्डाण पुलाखाली वाहतूक पोलिसांची नियुक्ती असली तरीही परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे. परिसरात वाहनांची मोठी वर्दळ; तसेच रस्ता अरुंद असल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी या समस्येबाबत तीव नाराजी व्यक्त केली आहे. दररोज कामावरून घरी जाताना किमान अर्धा तास येथे अडकून पडतो. यावर कायमस्वरूपी उपाय हवा, असे एका वाहनचालकाने अपेक्षा व्यक्त केली. लहान मुलांना शाळेतून आणताना किंवा रुग्णालयात जाताना वाहतूक कोंडीमुळे रस्त्यातच अडकून पडावे लागत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात.
प्रशासनाचे लक्ष कधी?
ही समस्या केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित नसून, शहराच्या एकूण वाहतूक व्यवस्थेवर परिणाम करणारी आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी
किवळे येथील बापदेव महाराज उड्डाण पुलाखालील वाहतूककोंडी ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. योग्य नियोजन आणि तत्काळ उपाययोजना केल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. अन्यथा, भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परिणाम काय होत आहेत?
इंधनाचा अपव्यय.
वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय.
वायू प्रदूषणात वाढ.
आपत्कालीन सेवांना विलंब.
उपाययोजना काय असू शकतात?
अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नेमणूक
रस्त्याचे रुंदीकरण.
स्वतंत्र लेनची व्यवस्था.
वाहतूक नियोजनात सुधारणा