खराळवाडी: खराळवाडी परिसरात गेल्या महिनाभरापासून दिवसभरात तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे सकाळी पाणी टाकीमध्ये चढवणे, मुलांचे शाळेचे आवरणे, डबा बनवणे हे कामे होत नाहीत. ऐन पावसळ्यात विद्युत पुरवठ्याशिवाय मनस्ताप सहन करण्याची वेळ खराळवाडीकरांवर आली आहे.
मागील महिन्यापासून तीन ते चार तासापेक्षा जास्त वेळ वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. खराळवाडी परिसरात कुठेही रिमझिम पावसाला सुरुवात झाली किंवा पाऊस पडणार असे वातावरण झाले तरी विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो. गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये चार तासापेक्षा जास्त वेळेस विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गांधीनगर परिसरात वारंवार वीज गायब होत असल्याने येथील नागरिक वैतागले आहेत. (Latest Pimpri News)
मागच्या वर्षी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू होता म्हणून खराळवाडी परिसरातील नागरिकांनी विद्युत वितरण विभागाचे कौतुक केले होते. तरीही खराळवाडी परिसरात मात्र किती काळ विद्युत पुरवठा सुरळीत राहतो, याची नोंद विद्युत मंडळांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा भूमिगत करण्याची मागणी होत आहे.
कारण कुठे झाड पडले की, केबल तुटून शॉर्टसर्किट होणे, विद्युत पुरवठा खंडित होणे, असेच प्रकार सर्रासपणे घडत असतात. यातून एखाद्या ठिकाणी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खराळवाडी परिसरात विद्युत पुरवठा कायम सुरळीत राहवा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत राहिला तर खराळवाडी विद्युत वितरण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ सिरसाठ, सुरेश बोचकुरे, प्रवीण कांबळे,आकेश वाव्हळ, कल्याण सिरसाठ, अर्जुन सिनगारे, बापू शिंदे, मनोज गजभार, राजेंद्र साळवे, विष्णू सरपते यांनी दिला आहे.
कामात दिरंगाई करणार्यांवर कारवाई करा
खराळवाडी गावठाण, सुदर्शन चौक, भरतनगर, खराळआई मंदिर परिसर, जामा मशीद, कामगारनगर, बजरंगनगर, दुर्गामाता मंदिर, भगवतगीता मंदिर,बनसाळ गल्ली, सुमेध बुद्ध विहार या भागात तीनचार तास वीजपुरवठा खंडित होतो.
सकाळी पहाटे सहा वाजता वीजपुरवठा खंडित होतो. नंतर नव वाजता लाईट येते. नागरिकांनी फोनवर विचारना केली की, आवाज कुठे आला कळवा असे प्रति सवाल खराळवाडी गांधीनगर परिसरात सेवा देणारे वायरमॅन नागरिकांना विचारतात. फोन बंद करून ठेवतात. तरी कामचुकार कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.