खराळवाडी: पिंपरी शहर, उपनगरांतील कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांवर आरोग्य विभागाकडून मागील सहा महिन्यांपासून रात्रपाळीची ड्युटी लावण्यात आली आहे. यामुळे महिल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून मोठा अन्याय केला जात आहे. यामुळे महिला कर्मचार्ऱ्यांच्या कामाच्या ड्युटीमध्ये बदल करावा, अशी मागणी होत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न मिळणे, कामावरून अचानक काढून टाकणे, कामाच्या ठिकाणी गैरवर्तन, कमी वेतन आणि सुविधांचा अभाव, इतर कायद्यानुसार मिळणाऱ्या सुविधा न देणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. घरामध्ये त्यांना वेळ देण्यासाठी शिफ्टमध्ये काम करणे सहाजिक होते; परंतु आरोग्य विभाग त्यांच्या सामाजिक-आर्थिक समस्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर सतत रात्रपाळीची ड्युटी लादत आहे.
तरी सफाई महिला कर्मचाऱ्यांनी ड्युटी बदलून मागितली तर अचानक त्यांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले जाते. वेतनात काटकसर करून वेतन पुढे ढकलणे या सारख्या अडचणीचा सामना करावा लागतो. तरी महापालिका आरोग्य विभागाने या कंत्राटी महिला साफसफाई कर्मचाऱ्यांची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी सफाई कामगार संघटनेने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
आम्हाला गेले सहा महिने झाले रात्रपाळीची ड्युटी जबरदस्तीने लादली आहे. रात्रपाळीला ड्युटीला येताना चौकाचौकांत तळीराम बसलेले असतात. त्याची भीती वाटते. शिवाय रात्रपाळीला काम, दिवसा मुलांची शाळा त्यांची तयारी, घरातील जबाबदारी यामुळे दैनंदिन शिफ्टमध्ये काम असावे, अशी भावना महिला कामगारांनी व्यक्त केली आहे.
येत्या काही दिवसांत कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांना दिवसपाळीची शिफ्टप्रमाणे ड्युटी बदलून देण्याची मागणी महापालिका प्रशासनाला केली आहे. जर अंमलबजावणी न केल्यास काही दिवसांत महापालिका भवन समोर आंदोलन छेडले जाईल.सुवर्णा निकम, शहराध्यक्षा अखिल भारतीय मजदूर सफाई कामगार संघटना
कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांना रात्रपाळीची ड्युटी बंद आहे. दिवसा काही भागात दुकाने चालू असल्याने साफसफाईचे काम करताना अडचणी येतात. त्यामुळे रात्रपाळीला पुरुष सफाई कामगारांकडून काम केले जाते.तानाजी दाते, आरोग्य सहायक अधिकारी, क प्रभाग कार्यालय, महापालिका