Mobile Addiction Pudhari
पिंपरी चिंचवड

Katta Culture Decline: मोबाईलमुळे हरवत चालला ‘कट्टा संस्कृतीचा’ संवाद

खराळवाडीत डिजिटल युगाचा परिणाम; प्रत्यक्ष संवादाऐवजी स्क्रीनमध्ये अडकलेली तरुणाई

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: कट्ट्यावर भेटू..., चला, थोड्या गप्पा मारू..., असे शब्द एकेकाळी तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या कानी पडत होते. शहर व परिसरातील चौक, उद्याने, वाड्या-वस्त्यांतील कट्टे हे केवळ बसण्याची ठिकाणे नव्हती, तर माणुसकी, संवाद आणि नात्यांना बळ देणारी केंद्रे होती. मात्र, आज मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे हा माणुसकीचा कट्टा हळूहळू हरवत चालल्याचे चित्र खराळवाडीमध्ये दिसून येत आहे.

संवाद झाला कमी

पूर्वी संध्याकाळ झाली की मित्रमंडळी, शेजारी, ज्येष्ठ नागरिक आणि युवक कट्ट्यावर एकत्र जमत असत. परिसरातील समस्या, सामाजिक प्रश्न, कुटुंबातील सुख-दुःख, रोजगार, शिक्षण आणि विविध विषयांवर चर्चा रंगत असे. याच कट्ट्यांवरून अनेक सामाजिक उपक्रमांची सुरुवात होत असे. आज मात्र त्याच कट्ट्यांवर शांतता आहे, कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल लॅपटॉप आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, ऑनलाईन गेम्स, व्हिडिओ आणि सततच्या इंटरनेट वापरामुळे प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याची सवय कालांतराने कमी झाली आहे. एकाच घरात राहणारी माणसेही एकमेकांशी बोलण्याऐवजी मोबाईलच्या स्क्रीनमध्ये व्यस्त असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मित्र समोर बसलेले असतानाही प्रत्येकाची नजर मोबाईलवरच खिळलेली असते.

तरुणांमध्ये एकटेपणा वाढला

याचा सर्वाधिक परिणाम सामाजिक नातेसंबंधांवर होत आहे. प्रत्यक्ष संवाद कमी झाल्याने गैरसमज वाढत आहेत. शेजारधर्म कमी होत आहे आणि एकमेकांच्या अडचणी समजून घेण्याची भावना कमी होत असल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करतात. पूर्वी कट्ट्यावरून मिळणारे मार्गदर्शन, अनुभव आणि आपुलकीची जागा आता व्हर्च्युअल चॅटने घेतली आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, मोबाईलचा अतिवापर केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो.

एकटेपणा, तणाव, चिडचिड आणि संवादाचा अभाव यांसारख्या समस्या वाढत आहेत. विशेषतः लहान मुले आणि तरुण पिढी प्रत्यक्ष संवादापेक्षा डिजिटल माध्यमांवर अधिक अवलंबून असल्याने सामाजिक कौशल्यांवर परिणाम होत आहे. आठवड्यातील काही वेळ मोबाईलपासून दूर राहून कुटुंबीय, मित्र आणि शेजाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची सवय लावली पाहिजे. परिसरातील कट्टे, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी पुन्हा सामाजिक संवाद वाढविण्यासाठी सांस्कृतिक, क्रीडा आणि सामुदायिक उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.

नात्यात आला दुरावा

मोबाईल हे आधुनिक जीवनातील महत्त्वाचे साधन असले तरी त्याच्या अतिरेकामुळे माणसांमधील जिव्हाळा, संवाद आणि आपुलकी हरवू नये. स्क्रीनवरील जग महत्त्वाचे असले तरी प्रत्यक्ष भेटीतून जपले जाणारे नाते आणि माणुसकी यांची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. त्यामुळे मोबाईल वापरा, पण माणुसकीचा कट्टा जपा, हा संदेश आज अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT