उमेश सणस
पिंपळे गुरव : कासारवाडी भुयारी मार्गाजवळील सिग्नल व्यवस्था मागील काही महिन्यांपासून बंद आहे. यामुळे कासारवाडी परिसरातून येणारी वाहने व महामार्गावरून कासारवाडी, पिंपळे गुरव परिसरात जाणार्या वाहनांना सातत्याने अपघात घडत आहेत. तसेच वाहतूक नियंत्रण करणारी सिग्नल व्यवस्था बंद पडल्याने वाहनचालक गाडी पुढे काढण्यासाठी धावपळ करतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. (pimpari chinchwad News)
या मार्गाने दररोज हजारो दुचाकी, रिक्षा, बस, ट्रक आणि चारचाकी वाहने जात असतात. मात्र, सिग्नल बंद असल्यामुळे वाहनचालकांना नियमबाह्य पद्धतीने वाहने चालवावी लागत असून, दररोज अपघाताचे प्रमाण वाढत आहे. पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी येथे भुयारी मार्गाजवळील बंद पडलेल्या सिग्नलमुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. भुयारी मार्गाच्या पलीकडे शाळा, कपड्यांची दुकाने, व्यापारी गाळे, हॉटेल्स आहेत. दुसर्या बाजूला रेल्वे फाटकाच्या पलीकडे मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला जाण्यासाठी हा सिग्नल पार करूनच जावे लागते. त्यातच चौकातील रस्त्याच्या कडेला रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. रस्ता अरुंद असल्यामुळे संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी तर स्थिती अधिकच गंभीर होते. कामावरून परतणारे कामगार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच व्यापारी वर्ग या कोंडीमुळे प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. वाहनचालकांचा संयम सुटून अनेकदा वादावादी, भांडणेही घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
अलीकडच्या काही दिवसांत अंडरपासजवळ झालेल्या अपघातामध्ये अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ट्रॅफिक पोलिसांची उपस्थित नसल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे.कासारवाडी अंडरपास हा पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून, येथे तातडीने उपाययोजना न झाल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा महापालिका व वाहतूक विभागाकडे सिग्नल दुरुस्तीची मागणी केली आहे. तरीही अद्याप या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. सिग्नल सुरू नसल्यामुळे गोंधळ उडतो. विशेषत: बस व मालवाहतूक वाहनांमुळे दुचाकीस्वार अडकून पडतात. महापालिकेने तातडीने सिग्नल यंत्रणा दुरुस्त करून वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अन्यथा गंभीर अपघात घडण्याची शक्यता आहे. तसेच दररोज होणार्या अपघातांची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
पुणे मुंबई महामार्गावरील कासारवाडी परिसरात पुणे नाशिक आणि पुणे मुंबईच्या दिशेने प्रवास करणारी वाहने येतात. त्यामुळे या भागात कायमच वाहनांची रहदारी असते. त्यामुळे सकाळ व सायंकाळी या भागात ट्राफिक वॉर्डन वाहतूक नियंत्रित करण्यासाठी उभे असतात. तसेच कासारवाडी येथील भुयारी मार्गाशेजारी बंद असलेला सिग्नल तात्काळ सुरू करण्यात येईल.- दीपक साळुंखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग.