नवी सांगवी: आगामी निवडणुकांचे बिगुल वाजताच कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी परिसरात विकासाच्या मुद्यांवरून मोठी चर्चा रंगू लागली आहे. परिसरातील इच्छुक उमेदवारांच्या पोस्टरबाजीला वेग आला असून, नागरिक मात्र कासारवाडी, फुगेवाडी, दापोडीचा विकास कुठे अडकला, या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. हा परिसर कधी स्मार्ट होणार, असा प्रश्न नागरिक करत आहेत.
नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या वेगाने विकसित झालेल्या परिसरांच्या तुलनेत कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी मागे का, असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून सातत्याने विचारला जात आहे. कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी हा पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मध्यवर्ती परिसर आहे. तरीही आधुनिक सुविधा, रस्ते, ड्रेनेज, क्रीडा सुविधा, सुशोभीकरण, पायाभूत सुविधा या सर्वच क्षेत्रात विकासाचा वेग अत्यंत मंद असल्याचे येथील नागरिकांचे मत आहे. सांगवी, पिंपळे गुरवचा स्मार्ट सिटीसारखा दर्जा, पिंपळे सौदागरचे रुंद रस्ते, उद्याने, उड्डाणपूल यांची तुलना केली असता कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी परिसर सर्वसामान्य वाटत आहे, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
तीन नगरसेवक असतानादेखील कासारवाडी, फुगेवाडी, दापोडीला सुशोभीकरण का मिळाले नाही, दापोडीत खेळाचे मैदान का विकसित झाले नाही, आरक्षित जागा पडूनच का आहेत, दापोडी, फुगेवाडीमध्ये जलतरण तलाव का उभारला गेला नाही, अशा कित्येक प्रश्नांची मालिका नागरिक उपस्थित करीत आहेत. येथील परिसराला दिवसाआड आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा हा तर कायमचा डोकेदुखीचा विषय ठरत आहे.
पिंपळे गुरव, सांगवी स्मार्ट होत असताना कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी मागे का राहिले आहे. स्विमिंग पूल नाही, खेळाची मैदाने नाहीत, सुशोभीकरण अपुरे, नगरसेवकांची सत्ता असूनही येथील परिसराला प्राधान्य का मिळाले नाही.संदीप गायकवाड
ड्रेनेजची समस्या वर्षानुवर्षे रेंगाळलेलीच, नदीकिनारी पूरस्थितीत पाणी रस्त्यावर येते. मग नदीकाठची संरक्षण भिंत उभारण्याचे काम अजूनही का रखडले आहे, असादेखील प्रश्न नागरिक विचारत आहेत. आगामी निवडणुका जवळ येत असताना कासारवाडी, फुगेवाडी, दापोडीचा विकास हा प्रमुख मुद्दा बनला आहे. अनेक वर्षांपासूनच्या समस्या, अपूर्ण प्रकल्प, रेंगाळलेली कामे, पायाभूत सुविधांचा अभाव, या सर्वच मुद्यांवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोणताही पक्ष किंवा उमेदवार कासारवाडी, फुगेवाडी, दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना आणि दृढ इच्छाशक्ती कधी दाखवणार, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी येथील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते अरुंद आहेत. शाळांचे डेव्हलपमेंट अपूर्ण आहे. पुराच्या पाण्याचा त्रास कायमच आहे, स्मशानभूमीतही आधुनिक सुविधा नाहीत. याकडे दुर्लक्ष का होत आहे.प्रतिभा जवळकर
दापोडीमध्ये आई गार्डनच्या शेजारील 350 एकर आरक्षित जागा खेळाच्या मैदानासाठी निश्चित आहे. मात्र, त्या जागेवर विकासकामाचा एक दगडसुद्धा हललेला नाही. अशी टीका नागरिक करत आहेत. सांस्कृतिक भवन, जलतरण तलाव, प्रशस्त रुग्णालय, अग्निशमन केंद्र या सर्व गोष्टी वर्षानुवर्षे चर्चेतच आहेत. पण प्रत्यक्षात आजतागायत काहीच झालेले नाही.
आरक्षित जागा आहेत, पण त्या वापरल्या जात नाहीत. काही जागांवर विकासकामे झाले पण बहुतांश जागा तशाच पडून आहेत. त्या जागांच्या मागे कुणाचा स्वार्थ आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. येथील परिसरातील पाणीपुरवठा आणि ड्रेनेज समस्या का सुटत नाही.सुषमा शेलार