

अमिन खान
तळेगाव दाभाडे: निवडणुका, मतदान आणि निकाल यावर पैजा लावण्यात मावळ नेहमी आघाडीवर असतो. मात्र, यंदा नगर परिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुकीतील दिवसागणिक बदललेली राजकीय समीकरणे यामुळे पैजकरी मंडळींचा पूर्ता हिरमोड झाला आहे. वडगाव नगरपंचायत आणि लोणावळा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप एकमेकांचे प्रतिस्पर्धी, तर तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती असे विरोधाभासी चित्र मतदानापर्यंत राहिले. त्यात भर म्हणून लोणावळा येथे 2 जागा तर तळेगावात 6 जागांवरील मतदानाला स्थगिती देण्यात आली आहे.
पैजांची रक्कम झाली कमी
आजपासून 15 दिवसांनंतर याठिकाणी मतदान होण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे निकालही पुढे ढकलला गेला आहे. या पार्श्वभूमीवर पैजा लावण्याचा मूडच निघून गेल्याचे काही पैजकरींनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. निवडणुकांच्या निकालावर मावळातील गावागावांत मोठ्या प्रमाणावर पैजा लावल्या जातात. पैजामध्ये 10 हजार ते लाखापर्यंत आकडे असतात. त्यात बहुतांश व्यापारी, बाजारपेठातील श्रीमंत मंडळी असतात. यंदा अशा धाडशी रकमांवर आपले अंदाज पणाला लावायचे प्रकार मोठ्या प्रमाणावर कमी झाले असल्याचे एका पैजबहाद्दराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. गेल्या आमदारकीच्या निवडणुकीत आपला अंदाज बरोबर ठरला आणि त्यांच्या भिशीच्या ग््रुापमधील सर्वांत जास्त रकमेच्या पैजा जिंकल्याचे त्याने सांगितले. मात्र, यंदा नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या जयपराजयावर खूपच रिस्क असल्याने यंदा हजार दोन हजाराच्या पैजेवर डाव लावला आहे.
मावळ लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार जाहीर केल्यानंतर गावोगावी पैजा लागण्याची परंपरा असते. मात्र, यंदा चित्र नेमके उलटे दिसत असून, संपूर्ण तालुक्यात पैजा लागल्या नाहीत. निवडणूक निकालासाठी आता 21 डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार असल्याने पैजेबाबत पूर्वीसारखा गाजावाजा, चर्चा आणि लगबग दिसत नाही. यामुळे ग््राामीण आणि शहरी भागातील पैजकरी निराशेत आहेत.
मावळात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांतील गोंधळामुळे पैजांचा जोश कमी झाला असून, वडगाव, लोणावळा आणि तळेगावातील वेगवेगळ्या युती-प्रतिस्पर्ध्यांमुळे राजकीय गणित गुंतागुंतीचे बनले आहे. 2 ते 6 जागांच्या मतदानावर स्थगिती आणि निकाल 17 दिवस पुढे ढकलल्याने पैजकरांचा उत्साह मावळला असल्याचे दिसत आहे. दहा हजारांपासून लाखापर्यंतच्या पैजांची परंपरा असूनही यंदा रिस्क जास्त वाटल्याने पैजांची संख्या घटली असल्याचे अनेकांनी सांगितले.
ग््राामीण भागातील पैजांचे स्वरूप साधे
ग््राामीण भागात पैजांचे रूप तुलनेने साधे आणि मैत्रीपूर्ण असते. जेवणाची ट्रीट देणे, ओली पार्टी ठेवणे, भिशीचा हप्ता भरणे, हातउसणे माफ करणे किंवा छोटीशी भेट देणे इतक्यापुरतीच ही मजेशीर पैज मर्यादित राहते. पण शहरी भागात चित्र पूर्णपणे बदलते. येथे काही श्रीमंत पैजकरी थेट मोठ्या रकमांवर खेळ करतात. महानगरांमध्ये तर निवडणुकीच्या निकालांवर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावला जातो. मावळ तालुक्यात लोणावळा, कामशेत आणि तळेगाव ही ठिकाणे अशा मोठ्या आर्थिक पैजांचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखली जातात.