Assault Pudhari
पिंपरी चिंचवड

Kalewadi Assault Case Dispute: काळेवाडी अत्याचार प्रकरणावरून महापालिकेत वाद; नगरसेवक-पोलिसांमध्ये आरोप-प्रत्यारोप

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; तक्रार प्रक्रिया व स्पष्टीकरणामुळे संभ्रम वाढला

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: काळेवाडी येथे अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून पोलिसांवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला आहे. नगरसेवक विनोद नढे यांनी पोलिसांनी साक्षीदार आणण्याची मागणी केली व लोकप्रतिनिधींशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप केला. यावर पोलिसांनी स्पष्टीकरण देत गुन्हा तात्काळ नोंदवून आरोपीला त्याच दिवशी अटक केल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथे 14 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. मुलीच्या कुटुंबियांनी तिला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून पोलिसांना माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एक पथक पीडितेच्या घरी तर, दुसरे पथक रुग्णालयात पाठवले. त्याच दिवशी गुन्हा दाखल करुन आरोपीला भोसरी येथून अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवारी (दि. 5) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक विनोद नढे यांनी या प्रकरणावरून पोलिसांवर टीका केली. पीडित मुलगी उपचार घेत असताना आम्ही तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलिसांनी साक्षीदार आणण्यास सांगितले, असा आरोप त्यांनी केला. तसेच, प्रकरणाचा फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची मागणीही त्यांनी केली.

संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोपही त्यांनी सभेत मांडला. या आरोपांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ गुन्हा नोंदवला व आरोपीला त्याच दिवशी अटक केली, असे स्पष्ट केले आहे.

तसेच, घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी संबंधित लोकप्रतिनिधींनी निवेदन दिले असल्याचे नमूद करत काही व्हिडिओ क्लिप्सद्वारे दिशाभूल होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात नगरसेवकांचे आरोप आणि पोलिसांचे स्पष्टीकरण यामुळे परिस्थितीबाबत संभम निर्माण झाला असून, पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT