नवलाख उंबरे: मावळ तालुक्यातील जांबवडे येथून एमआयडीसीला जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून, स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. एमआयडीसी परिसरातील अवजड वाहनांची सततची ये-जा आणि वाढलेली वाहतूक यामुळे रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेला डांबर आणि उडणारी धूळ यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
धुळीने नागरिक त्रस्त
रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना धुळीचा सर्वांधिक त्रास सहन करावा लागत आहे. घरात बसूनही धुळीचे कण श्वासावाटे शरीरात जात असल्याने लहान मुले आणि वृद्धांमध्ये श्वसनाचे विकार वाढत असल्याचे समोर आले आहे. वाहनचालकांनाही या रस्त्यावरून प्रवास करताना मोठा धोका पत्करावा लागत आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनते. दरम्यान, ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाविषयी ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
जांबवडे येथील रस्त्याचा प्रश्न आता केवळ गैरसोयीचा न राहता आरोग्य आणि सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा बनला असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. जांबवडे ग्रामस्थांना दररोज अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची आखणी दयनीय अवस्था झालेली असते. यामुळे नागरिकांना घराबाहेरही पडणे शक्य होत नाही. रस्ता खराब असल्यामुळे आतापर्यंत वाहने पडून अनेक अपघात झाले आहेत. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच, लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मागील अनेक महिन्यांपासून फक्त आश्वासने मिळत आहेत; पण प्रत्यक्ष अजूनही याबाबत कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.तानाजी नाटक, सरपंच, जांबवडे
आज औद्योगिक क्षेत्रात जरी प्रगती होत असली तरी औद्योगिक क्षेत्राजवळील गावाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.सागर नाटक, उपसरपंच, जांबवडे
दिवसभर अवजड ट्रक ये-जा करत असल्याने इतकी धूळ उडते की घराची दारे-खिडक्या बंद ठेवूनही काही उपयोग होत नाही. यामुळे लहान मुलांना खोकला आणि ताप या आजारांची लागण होते. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात.नंदा गणेश भोसले, सदस्य, ग्रामपंचायत