पंकज खोले
पिंपरी : इंजिनिअर, डॉक्टर असे उच्चशिक्षण घेऊन शहरात नावाजलेल्या व्यक्ती आपण पाहतो. मात्र, कष्टाचे काम करूनही व्यावसायिकांच्या रांगेत बसणारे उद्योजक महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षक केंद्राने म्हणजेच आयटीआयने घडवले आहेत. आत्तापर्यंत दोनशेहून अधिकांना उद्योगात उभे केले असून, ते आता याच आयटीआयमधील बाहेर पडलेल्यांना नोकरी देतात. विविध 14 ट्रेडमधून एमआयडीसीलगतच्या भागात आपला स्वयंरोजगार सुरू केला असून, तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
मोरवाडी आयटीआयमध्ाून दरवर्षी सरासरी चारशे ते पाचशे विद्यार्थी हे स्किलचे शिक्षण घेऊन बाहेर पडतात. कंपनी, आस्थापना येथे अॅप्रेन्टिशीप म्हणजेच शिकाऊ म्हणून रूजू होतात. पण, पुढे कंपनीत कायम नोकरी मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे अनेक जण स्वतः व्यवसायाकडे वळतात. त्यातच एक चांगला उद्योजक घडत असल्याचे दिसून येते.
पिंपरी चिंचवडमध्ये आयटीआयच्या दोनशेहून अधिक विविध विद्यार्थ्यांनी छोट्या-मोठ्या कंपन्या सुरू केल्या आहेत. त्यात त्यांना लागणारे मनुष्यबळ अथवा इतर मदत ही आयटीआयमधील विद्यार्थ्यांकडून मिळावी, यासाठी ते प्रयत्न करतात. कारण, त्यासाठी ते नेहमीच येथील प्राचार्य, शिक्षकांच्या संपर्कात असतात.
विविध ट्रेडचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार, उद्योजकांची संधी मिळावी यासाठी ओजीटी आणि डीएसटी हे दोन प्लॉटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यात ओजीटी म्हणजेच ऑन जॉब ट्रेनिंग यात दोनशे तास कंपनीत काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून रोजगार व उद्योजकांसाठी काय कल आहे ते समजते. तर, डीएसटी म्हणजेच ड्युएल सिस्टिम टेनिंंगमध्ये सहा महिने काम आणि सहा महिने शिक्षण उपलब्ध असून, त्यातून अनेकजण कमी वयातच स्किल आत्मसात करतात.
पुण्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींपैकी भोसरी एमआयडीसी वसाहत म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर लगतची असलेली चाकण, तळेगाव या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता असते. दरम्यान, या ठिकाणी अनेक कंपन्यांना कच्चा माल, छोटे साहित्य पुरविण्याच्या कामांची मोठी यादी आहे. शहरात अशा प्रकाराचे साहित्य उपलब्ध नसल्याने अनेकांना जिल्ह्याच्या बाहेरून ते मागवावे लागतात. त्यामुळे सूक्ष्म, लघू उद्योजकांची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पिंपरीतील आयटीआयमधून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आपल्या मेहनतीच्या जोरावर परदेशातही पोचले आहेत. इलेक्ट्रीक आणि कुलिंग सर्व्हिसच्या माध्यमातून त्यांनी तेथेही आपली छाप सोडली आहे. ऑस्ट्रेलिया येथे 3 तर, गल्फ देशात म्हणजेच सौदी अरेबिया, ओमान या ठिकाणी जवळपास 6 विद्यार्थी काम करत आहेत.
पेंटरचा ट्रेड पास झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होतो. दोन वर्षे विविध ठिकाणी नोकरीसाठी फिरलो. मात्र, यश आले नाही. अखेर आठशे रुपये गोळा करून छोटा व्यवसाय सुरू केला. आता कोट्यवधीची उलाढाल होत आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंब पाठिशी असल्याने इथपर्यंत पोचलो. गुजरात येथून काही ऑर्डरदेखील येतात.हेमंत जगताप, उद्योजक