पंकज खोले
पिंपरी: परदेशी जातीचे श्वान पाळण्याचे फॅड सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेकजण त्यांचा लहान मुलांप्रमाणे सांभाळ करतात. साहजिकच हे श्वान माणसाळल्यामुळे त्यांचा घरात कुठेही वावर असतो; मात्र कधीकधी ते आक्रमक होऊन माणसांवर हल्ला करण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे परदेशी जातींचे श्वान पाळताना काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा हे श्वानप्रेम अंगलट येऊ शकते.
श्वानाच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. याची गंभीर दखल केंद्राने गेल्या वर्षी परदेशी 23 जातींच्या श्वानांना घरात पाळण्यास बंदी घातली होती. मात्र, अशा प्रकारची बंदी राज्यासाठी लागू नसल्याने शहरांमध्ये हे श्वान सर्रासपणे विकले जात आहेत. याबाबत कोणताही नियम अथवा बंदी नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. (Latest Pimpri News)
देशामध्ये या प्रकारचे श्वान मोठ्या प्रमाणात विकले जाते. मात्र, अलीकडे या जातीच्या श्वानांकडून माणसांवर केल्या जाणार्या हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे अमेरिकासहित फ्रान्स यासह अन्य 40 देशांनी अशा हिंस्त्र श्वानांवर बंदी घातलेली आहे.
तर, अनेक देशांमध्ये पिटबुल जातीच्या श्वानांना लोकवस्तीमध्ये अथवा सोसायटीत पाळण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील पशू विक्रेते यांच्याशी याबाबत विचारणा केली असता, राज्यामध्ये तरी अशा प्रकारचे कोणत्याही बंदीबाबत आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अशा प्रकारच्या आक्रमक वर्तन करणार्या श्वानांची निर्धास्तपणे विक्री केलीजात आहे.
पॉमेरियन, लेब्रोडॉर, गोल्डन रे ट्रेवल, जर्मन शेफ्ड, बिगल अशी काही कुत्र्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. हे श्वान सामान्यतः लोकवस्तीमध्ये शांतपणाने फिरू शकतात. या श्वानांमुळे कोणालाही धोका नसतो; मात्र पिटबुल, रोत्तवेइलर, डोगो अर्जेंटिनो, अमेरिकन बुलडॉग, सायबेरियन हस्की या जातीचे श्वान आक्रमक प्रकारात मोडतात. त्यामुळे श्वानप्रेमींनी असे श्वान पाळताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.
35 ते 70 हजार किंमत
या जातीच्या श्वानांची किंमत तब्बल 35 ते 70 हजारांच्या घरात आहे. मात्र, सद्यस्थितीत किमती कमी झाल्या आहेत. या जातीच्या श्वानांना पाळणे कठीण बनले आहे. प्रत्यक्षामध्ये फार्म हाऊस, शेती अशा मोकळ्या ठिकाणी या श्वान पाळले जाते. शहरांमध्ये अथवा लोक वस्तीमध्ये हे श्वान आक्रमक बनतात.
बंदीचा नियम माघारी
केंद्र शासनाने लागू केलेला बंदीचा नियम पुन्हा दोन महिन्यांनंतर माघारी घेण्यात आला आहे. चोवीस कुत्र्यांच्या जातींची आयात, प्रजनन आणि विक्रीस पुढील आदेशापर्यंत मनाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
चावा जीवघेणा
आक्रमक 23 जातीतील हे श्वान माणसाच्या मानेवर, डोक्यावर थेटपणे हल्ला करते. त्याची पकड खूपच घट्ट असल्याने त्यातून सुटका करून घेणे मोठे सहजशक्य होत नाही. त्यामुळे त्यांचा चावा जीवघेणा ठरू शकतो. अनेकदा हे श्वान फिरायला घेऊन गेल्यास इतरांवर हल्ला करू शकते. त्यामुळे या आक्रमक जातीतील श्वानप्रेम थोडे सांभाळूनच करणे गरजेचे आहे.
विक्रेते म्हणतात, बंदी नाहीच!
केंद्र शासनाने या जातीच्या श्वानांच्या प्रजननावर बंदी घालण्याचीही सूचना करण्यात आली आहे. त्याबाबत मार्च 2024 मध्ये आदेश काढला होता. पशुसंवर्धन मंत्रालयाचे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून अशा श्वानांच्या पालनास परवाना न देण्याच्या सूचना केल्या आहेत; मात्र त्यानंतर तो पुन्हा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे अशी कोणत्याही प्रकारची बंदी नसल्याचे शहरातील प्राणी, पक्षी विक्रेते सांगतात.
आक्रमक अन् हिंस्त्र श्वान
केंद्र शासनाच्या आदेशाने 23 श्वान बंदीबाबत आदेश काढला होता; मात्र त्याला निमल वेल्फेअर संस्थेच्या वतीने विरोध करण्यात आला. त्यामध्ये पिटबुल, रॉटवेलर, टेरियर, टोसा इनू, अमेरिकन स्टॅफोर्डशायर टेरियर, फिला ब्राझेलरियो, डोगो अर्जेंटिनो, अमेरिकन बुलडॉग, बोझबोएल, कँगल, सेंट्रल एशियन शेफर्ड डॉग, कॉकेशियन शेफर्ड डॉग, जपानी टोसा, कॅनारियो, रोडेशियन रिजबॅक अक्बाश, जॅपनीज टोसा, वोल्फ डॉग, मॉस्को गार्ड, केन कॉर्सो, टोरनजॅक आणि टॉर्नजॅक यांचा समावेश आहे. यापैकी अनेक श्वान हे भारताच्या वातावरणात रूळत नाहीत. परिणामी ते आक्रमक होतात, असे प्राणिप्रेमींचे म्हणणे आहे.
केंद्र शासनाने लागू केलेल्या संबंधित पत्राबाबत प्राणिप्रेमीचा विरोध होता. दरम्यान, या आदेशाबाबत स्पष्टता आणि कायदेशीर आधार नसल्याने तो राज्यामध्ये लागू नव्हता. मात्र, अशा प्रकारची श्वान पाळणार्या व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच त्याची नोंदणीदेखील करणे गरजेचे आहे.डॉ. शीतल कुमार मुकणे , सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग