आयटी कर्मचार्‍यांची ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी; पावसामुळे होतेय वाहतुक कोंडी  Pudhari
पिंपरी चिंचवड

IT employees demand: आयटी कर्मचार्‍यांची ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी; पावसामुळे होतेय वाहतुक कोंडी

शहरात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी, सखल भागांत साचलेले पाणी आणि खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

IT employees demand work from home

पिंपरी: शहरात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी, सखल भागांत साचलेले पाणी आणि खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर हिंजवडीसह इतर आयटी पार्कमधील कर्मचार्‍यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा तातडीने लागू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज या संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी ही मागणी केली आहे.

पवनजीत माने यांनी पुढारीशी बोलताना सांगितले की, बहुतांश आयटी कंपन्या आधीपासूनच संमिश्र (हायब्रिड) पद्धतीने कामकाज करीत आहेत. त्यामुळे काही दिवस घरून कामकाज करण्याची मुभा दिल्यास उत्पादनक्षमतेवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही. उलट, कर्मचारी खड्डेमय रस्त्यांमध्ये व पाण्यात अडकून राहणार नाहीत आणि अपघाताचा धोका टळेल. (Latest Pimpri News)

अपघाताचा धोका वाढला

शहरातील रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय आहे की, पावसामुळे खड्डे दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक भुयारी मार्ग व सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. परिणामी वाहतुकीला मोठा फटका बसत असून वाहनांच्या रांगा लागतात. अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी घरून काम करण्याची परवानगी देणे गरजेचे असल्याचे फोरमचे म्हणणे आहे.

मे महिन्यातही केली होती मागणी

मान्सूनपूर्व पावसाळ्यात मे महिन्यातही आयटी कर्मचार्‍यांनी अशीच मागणी केली होती. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीतही त्यांनी वर्क फ्रॉम होमकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी हिंजवडी व आसपासच्या आयटी पार्क परिसरातील वाहतुकीची समस्या भीषण बनली होती. दररोज संध्याकाळी काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागत होत्या. त्यानंतर पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर झाली असून, आता प्रशासनाने सक्तीने वर्क फ्रॉम होमचा निर्णय घ्यावा, अशी कर्मचार्‍यांची भूमिका आहे.

अपूर्ण प्रकल्प, वाढती कोंडी

मागील काही वर्षांत आयटी पार्कमध्ये कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढली. त्याच वेळी वाहनांची संख्याही तिपटीने वाढली. मात्र रस्ते रुंदीकरण, पर्यायी मार्ग आणि उड्डाणपुलांच्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाले. अखेर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तब्बल 650 कोटी रुपयांचे प्रकल्प जाहीर केले. यात उड्डाणपूल व पर्यायी रस्ते यांचा समावेश होता. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकल्पांवर प्रत्यक्ष कामकाज सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या वाढत आहेत.

सरकारकडे थेट मागणी

वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेतल्यास वाहतुकीवरील ताण कमी होईल, प्रशासनावरील दडपणही कमी होईल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कर्मचार्‍यांची सुरक्षितता जपली जाईल, असे फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचार्‍यांनी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT