82 crore worth data stolen
पिंपरी: हिंजवडी आयटी हब येथील फ्युचरिइम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित आयटी कंपनीतील गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्सची चोरी करून तब्बल 82 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले.
याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी कंपनीच्या तीन माजी कर्मचार्यांना अटक केली आहे. ही घटना एप्रिल 2024 पासून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत घडली आहे.याप्रकरणी दत्तात्रय प्रभाकर काळे (45, रा. थेरगाव) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pimpri News)
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळे यांच्या कंपनीत आरोपी वरिष्ठ पदांवर काम करत होते. त्यांना कंपनीच्या प्रकल्पांशी संबंधित गोपनीय माहिती, कॉपीराईट संरक्षित सोर्स कोड व अत्याधुनिक सॉफ्टवेअर सोल्युशन्सची माहिती होती; मात्र कंपनीसोबत केलेल्या कराराचा भंग करून त्यांनी संगनमताने ही माहिती चोरली.
चोरी केलेल्या सोल्युशन्सचा वापर करून त्यांनी स्वतःची नवीन कंपनी स्थापन केली. केवळ एवढेच नाही, तर या कंपनीच्या नावाखाली त्यांनी 100 हून अधिक बेकायदा वेबसाइट्स विकसित करून ग्राहकांना सेवा पुरवल्या.
या प्रक्रियेत फिर्यादीच्या कंपनीला मिळणारा मोबदला, भविष्यातील करारातील अपॉर्च्युनिटी लॉस तसेच इतर तांत्रिक सेवांचा महसूल मोठ्या प्रमाणावर कमी झाला. परिणामी, एकूण नुकसान 82 कोटी रुपये इतके झाले असल्याचेतपाासात स्पष्ट झाले आहे.
न्यायालयीन निर्णय आणि पुढील तपास
अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगत पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयानेही या युक्तिवादाला मान्यता देत आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
..यांनी केली कामगिरी
ही कारवाई पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, पोलिस अंमलदार हेमंत खरात, अतुल लोखंडे, दीपक भोसले, नितेश बिचेवार, विनायक म्हसकर, सोपान बोधवड, सुभाष पाटील, माधव आरोटे, श्रीकांत कबुले, मुकुंद वारे, अभिजीत उकिरडे, निलेश देशमुख, ज्योती साळे, वैशाली बर्गे, शुभांगी ढोबळे, दीपाली चव्हाण यांच्या पथकाने केली.
बाणेर येथील कंपनीवर पोलिसांचा छापा
तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी गोपनीय तपास सुरू केला. आरोपींनी बाणेर येथे स्थापन केलेल्या नव्या कंपनीवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांनी तीन लॅपटॉप, चार मोबाईल फोन आणि महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त केले. आरोपींनी केवळ देशांतर्गतच नव्हे, तर अमेरिकास्थित ग्राहक कंपनीसोबत संगनमत करूनही हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे.
आयटी कंपन्यांसाठी इशारा
आयटी क्षेत्रात काम करणार्या कंपन्यांनी डेटा सुरक्षा, करारातील अटी आणि कर्मचार्यांच्या जबाबदार्यांबाबत अधिक कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. काही मोजक्या गुन्हेगारी वृत्तीच्या कर्मचार्यामुळे कंपनीला शेकडो कोटींचे नुकसान सहन करावे लागू शकते, हे या प्रकरणातून उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
बिश्वजीत मिश्रा (45, रा. बाणेर, पुणे)
नयुम शेख (42, रा. कोंढवा, पुणे)
सागर विष्णू (39, रा. रहाटणी, पुणे)