Indrayani river project Pudhari
पिंपरी चिंचवड

Indrayani river project: इंद्रायणी नदी प्रकल्पाचा लवकरच श्रीगणेशा

526 कोटी खर्चाचे काम दोन वर्षांत होणार पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन (सुधार) प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पास शासनाने अमृत 0.2 मधून मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या 526 कोटी रूपयांपैकी निम्मा 263 कोटी रूपयांचा निधी केंद्र व राज्य सरकार महापालिकेस देणार आहे.

त्या निविदेस तीन ठेकेदारांनी प्रतिसाद दिला असून, लवकरच प्रकिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांसह आळंदीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना नदीत स्वच्छ पाणी मिळणार आहे.

इंद्रायणी नदीची एक बाजू पिंपरी-चिंचवड शहर तर दुसरी बाजू पीएमआरडीए हद्दीतून वाहते. निघोजे ते चऱ्होली असे 18.50 किलोमीटर अंतर नदीच्या एका बाजूने महापालिका हा प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी एकूण 526 कोटी रूपये खर्चाचा डीपीआर तयार केला आहे.

प्रक्रिया करुनच सांडपाणी नदीत

या प्रकल्पातच चिखलीतील रिव्हर रेंसिडन्सी येथे 40 एमएलडी क्षमतेचा मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) आणि डुडुळगाव येथे 20 एमएलडीचा दुसरा एसटीपी असणार आहे. नाले व ड्रेनेजलाईनद्वारे थेट इंद्रायणी नदीत मिसळणारे सांडपाणी एसटीपीकडे वळविले जाणार आहेत.

एसटीपीत प्रक्रिया केल्यानंतरच सांडपाणी नदीत सोडले जाणार आहे. नदी काठावर सुशोभिकरण करून देशी झाडे लावून हरित क्षेत्र निर्माण केले जाणार आहे. नदी काठावर हिरवळ व शोभिवंत झाडे लावून उद्यान विकसित केले जाणार आहे.

जॉगिंग ट्रॅक व पादचारी मार्ग तसेच, विसर्जन घाट विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे नदीचे प्रदूषण तसेच, अतिक्रमण कमी होऊन पाणी स्वच्छ राहण्यास मदत होईल. परिणामी, आळंदी तीर्थक्षेत्र येथे येणाऱ्या लाखो भाविक तसेच, वारकऱ्यांना इंद्रायणी नदीत स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

50 टक्के खर्च महापालिका करणार

प्रकल्पाचा 526 कोटी खर्चाचा डीपीआर 20 जून 2023 ला तयार झाला. त्याला 29 ऑगस्ट 2025 ला तांत्रिक मान्यता मिळाली. हा प्रकल्प अमृत 0.2 मधून केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासन प्रत्येकी 25 टक्के निधी देणार आहे.

तर, महापालिका 50 टक्के खर्च करणार आहे. महापालिकेने या कामाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यासाठी एल. सी. इन्फा, दिनेशचंद आर इन्फा आणि एसएमसी इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. या तीन ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू केले जाणार आहे.

असा आहे प्रकल्प

  • एकूण अंतर 18.50 कि.मी.

  • नदीची एक बाजू महापालिकेकडे

  • 36 लाख 17 हजार चौरस मीटर एकूण क्षेत्र

  • चिखलीत 40 एमएलडी व डुडुळगावात 20 एमएलडी क्षमतेच दोन एसटीपी उभारणार

  • नदीकाठावर सुशोभीकरण, वृक्षारोपण, दाट वन क्षेत्र

  • एकूण खर्च 526 कोटी (अधिक जीएसटी)

  • राज्य, केंद्राकडून प्राप्त होणार 263 कोटींचा निधी टप्प्याटप्प्याने

  • निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT