मावळ: लोणावळा शहर व मावळ तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. नदीच्या पुराचे पाणी आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये पसरल्यामुळे कार्ला, मळवली, सदापूर, वाकसई चाळ, सांगिसे पूल, शिलाटणे, देवले रस्ता हा सर्व परिसर जलमय झाला असून या संपूर्ण भागामध्ये पुराचा विळखा बसला आहे.
लोणावळा शहरामध्ये मागील 24 तासांमध्ये 432 मिमी पाऊस तर दोन दिवसात 574 मिमी एवढा विक्रमी पाऊस झाला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पाऊस लोणावळा शहर व घाटमाथा परिसरामध्ये सुरू असल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे. लोणावळा शहरातील देखील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. (Latest Pimpri News)
लायन्स पॉईंट कडे जाणारा रस्ता भुशी धरणा जवळ पूर्णतः पाण्याखाली गेला असून आजूबाजूच्या दुकानांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. वाकसई सदापूर रस्ता हा पाण्याखाली गेला असून अनेक बंगल्यांना व घरांना पाण्याचा विळखा बसला आहे. संपूर्ण रस्ता जलमय झाल्याने या भागातील संपर्क तुटला आहे.
सदापूर मळवली रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे त्यामुळे सदापूर गावाकडे जाणारे व येणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. देवले रस्ता हा देखील पाण्याखाली गेला असून तीन ते चार फूट पाणी रस्त्यावर साचले आहे. वाकसई चाळ परिसराला पूर्णतः पाण्याचा विळखा बसला आहे.
वाकसई येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून भात शेती पाण्याखाली गेली आहे. आई एकवीरा देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता हा देखील पाण्याखाली गेला आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणीच असल्याने स्थानिक नागरिक व भाविक यांना प्रवास करणे धोकादायक बनले आहे.