मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची समस्या कायम आहे. भटक्या कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटना वाढतच असून, एका महिन्यास दीड हजारांपेक्षा अधिक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. महापालिकेकडून मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाही कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
टपर्या, खाद्यपदार्थ, चायनीज विक्रेते, नागरिक व श्वानप्रेमींकडून तसेच, उघड्यावर व कचराकुंडीत सहजपणे खाद्य मिळत असल्याने मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. शहरात अंदाजे एक लाखांच्या आसपास भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याचा अंदाज आहे. (Latest Pimpri News)
रात्रीच्या वेळी वाहने व पादचार्यांवर कुत्री धावून जातात. कुत्रे अचानक अंगावर आल्याने त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी वाहन पळविताता किंवा पळताना अपघात होतात. रात्री अंधारात व सुनसान रस्त्यांवर नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन जावे लागते.
कुत्र्यांच्या चाव्यामुळे तसेच, अपघात होऊन जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेषत: लहान मुलांवर हल्ला करून चावे घेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. वर्षाला 17 हजार जणांना कुत्री चावत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मोकाट कुत्री पकडून त्याच्यावर नसबंदी (निर्बिजीकरण) शस्त्रक्रिया केली जाते. एका शस्त्रक्रियेसाठी महापालिका सुमारे 1 हजार रुपये खर्च करते. त्यावर वर्षाला कोट्यवधीचा खर्च होत आहे. असे असले तरी, शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन अयपशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
तक्रारींवर कारवाई होत नसल्याने संताप
महापालिकेकडे तसेच, सारथी हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर काही तक्रारींवर कारवाई न करताच ती बंद केली जाते. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कुत्री पकडण्यासाठी पथक पाठविले जाते. सायंकाळनंतर कुत्री त्रास देत असल्यास त्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
प्राणीप्रेमींकडून कुत्री पकडण्यास विरोध
चायनीज, खाद्यपदार्थ विक्रेते, मांस व चिकन विक्रेते व हॉटेल व्यावसायिक तसेच, रहिवाशी कचराकुंडी, गटार किंवा उघड्यावर शिल्लक व शिळे अन्नपदार्थ फेकून देतात. प्राणीप्रेमी नागरिक कुत्र्यांना खरखटे व शिल्लक अन्न जमा करून आणून टाकतात. भटकी कुत्री त्या अन्नावर जगतात. त्यामुळे त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होते.
कुत्री एका वेळी 5 ते 10 पिल्लांना जन्म देते. त्यामुळे कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढते. महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात नसबंदी शस्त्रक्रिया होत नसल्याने कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येत नाही. मनुष्यबळाची कमतरता असल्याची कारणे महापालिकेकडून दिली जात आहेत. प्राणीप्रेमी मंडळी भटकी कुत्री पकडण्यास विरोध करतात. या कारणांमुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
नसबंदी शस्त्रक्रियेची संख्या वाढविण्यावर भर
महापालिकेच्या नेहरूनगर येथील कुत्री नसबंदी केंद्रावर पिंजर्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. पशुवैद्यकीय विभागाचे मनुष्यबळ वाढविण्यात येत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, लाईव्ह स्टॉक सुपरवाझर, डॉग पिक स्कॉड कुली अशी एकूण 16 पदे भरण्यात आली आहेत. कुर्त्यांची नसंबदी शस्त्रक्रिया वाढविण्यात येत आहे, असे पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.
पालिकेकडे पुरेशा प्रमाणात अॅन्टी रेबीज इंजेक्शन असल्याचा दावा
भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर त्या व्यक्तीस रेबीज हा जीवघेणा रोग होतो. रुग्ण दगावू नये म्हणून अॅन्टी रेबीजचे इंजेक्शन दिले जाते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात जखमींना ते इंजेक्शन विनामूल्य दिले जाते. दरवर्षी अॅण्टी रेबीजच्या सुमारे दहा हजार औषधांच्या बाटल्या खरेदी केल्या जातात. रुग्णालयात पुरेशा प्रमाणात औषधे असल्याचा दावा मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केला आहे.