पिंपरी: पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये 2008 पासून एड्सच्या रुग्णांना आरोग्य सेवा व सुविधा पुरविल्या जात आहेत. 2008 ते 2020 दरम्यान 14,772 रुग्ण एआरटी सेंटरमध्ये उपचार घेत होते. तर, 2021 ते 2025 दरम्यान दर महिन्याला 6,346 हजार रुग्ण या एआरटी सेंटर (एन्टीरिक्ट्रो वायरल थेरपी) मध्ये उपचार घेत आहेत.
जागतिक एड्स दिवसानिमित्त देशभरात केलेल्या संशोधनात एचआयव्ही रुग्णांची संख्या कमी झाल्याचे समोर आले आहे. संशोधनात 2010 ते 2024 दरम्यान देशात नवीन एचआयव्ही संसर्गामध्ये तब्बल 49 टक्के घट, तर एड्स संबंधित मृत्यूमध्ये 81 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. याच दिवसांमध्ये आईकडून बाळाला होणाऱ्या संसर्गात 75 टक्क्यांची घट झाली आहे. एआरटी सेंटर (एंटी - रेट्रोव्हायरल थेरपी) उपचार, वाढलेली तपासणी यामुळे हे शक्य झाले आहे.
वायसीएम रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये ग्रामीण भागातील व शहरी भागातील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये लोणावळा, आळेफाटा, जुन्नर, आंबेगाव, चाकण, खेड, मंचर आदी ठिकाणाहून रूग्ण उपचारासाठी येतात. याठिकाणी औषधोपचराबरोबरच त्यांना समुपदेशनही केले जाते. एचआयव्हीची लागण होऊ नये यासाठी समुपदेशन केले जाते. तसेच, या ठिकाणी 3 ते 4 महिन्यांचे एचआयव्ही बाधित बालक व त्यापुढे वयोवृद्ध उपचार घेत असतात.
औद्योगिकपट्ट्यात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार आहेत. या कामगारांमध्ये गुप्तरोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. नोकरीच्या शोधात आलेले विवाहित व अविवाहित लोक लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी देहविक्रय कणाऱ्यांच्या संपर्कात येतात. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे अनेक कामगारांना एड्सची लागण होते. अपुऱ्या ज्ञानामुळे तसेच योग्य ती काळजी न घेतल्याने अनेक जण एचआयव्हीसारख्या आजाराला बळी पडतात.
शहरामध्ये वायसीएममधील स्वधार व भोसरीतील नारी (नॅशनल एडस रिसर्च इन्स्टिट्यूट) या संस्थादेखील एड्सगस्तांसाठी काम करत आहेत. स्वाधारचे समुपदेशन केंद्र 2005 सालापासून पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आहे. त्या अंतर्गत ‘रेज ऑफ होप’ हा प्रकल्प सुरू आहे. वायसीएमच्या एआरटी सेंटरतर्फे नोंदणी केल्या रुग्णाच्या घरी स्वाधारचे कर्मचारी प्रत्यक्ष भेट देतात. एचआयव्ही बाधित रुग्णाला औषधोपचाराबरोबर सकस आहाराची अत्यंत गरज असते. ‘रेज ऑफ होप’ प्रकल्प त्याच्या सकस आहारवर भर देतो. या मुलांचे मूलभूत हक्क धोक्यात येतात. त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम स्वधार संस्था करत आहे.
एआरटी थेरपीमध्ये नवनवीन संशोधन होत आहेत. त्यामुळे रुग्णांचे आयुष्यमान वाढले आहे. तसेच, त्यांच्याद्वारे होणाऱ्या संक्रमणाचे प्रमाण कमी झाले आहे. रुग्णाला इतर आजार झाले तर प्रभावी उपचार पद्धतीदेखील उपलब्ध आहेत. जनजागृती आणि समुपदेशन यामुळे संक्रमणाचे प्रमाण कमी झाले आहे.डॉ. नितीन मोकाशी, नोडल अधिकारी, एआरटी सेंटर, वायसीएम रुगणालय