पिंपरी : हिंजवडी परिसरातील प्रस्तावित नव्या रस्त्यांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली असून, या रस्त्यासाठी आवश्यक जागेसाठी भूसंपादन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. भूसंपादनानंतर पीएमआरडीएकडून या रस्त्याच्या उभारणीसाठी निविदा काढण्यात येणार आहे. (Latest Pimpri chinchwad News)
हिंजवडी आयटी पार्कमधील नागरी समस्या, वाहतूक कोंडी आणि एकूणच आयटी पार्क परिसर सुधारण्यासाठी पीएमआरडीए समवेत सर्वच शासकीय यंत्रणांनी या ठिकाणी लक्ष घातले होते. दरम्यान, या ठिकाणांची कोंडी फोडण्यासाठी येथे पाच रस्त्यांची आखणी पीएमआरडीएच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार, प्रामुख्याने तीन रस्त्यांवर जवळपास दीड हजारांहून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली होती. त्यानुसार, त्या ठिकाणी रस्ते निर्मिती करण्यात येणार आहे.
हिंजवडी आयटी पार्कला जोडणासाठी लक्ष्मी चौक, छत्रपती शिवाजी चौक, मारुंजी, पांडवनगर या ठिकाणाहून रस्ते जोडण्यात येणार आहे. एकूण दहा रस्ते असून, ते 20 किलोमीटरचे असणार आहेत. त्यातील पांडवनगर ते माणगाव आणि तेथून मेझा 9 हा सर्वाधिक 4.85 किलोमीटरचा असणार आहे. तर, इतर रस्ते हे 1 ते 3 किलोमीटर असणार आहे.
दरम्यान, या रस्त्यांवर अतिक्रमणे काढल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर या रस्त्यासाठी निविदा काढण्यात येईल. दरम्यान, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. तसेच, सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची डागडुजी आणि दुरुस्तीदेखील करावी लागणार आहे.
हिंजवडी परिसरातील रस्त्याबाबत नुकतीच बैठक झाली असून, पाच मुख्य रस्त्यांच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते.शिवप्रसाद बागडी, अधीक्षक अभियंता, पीएमआरडीए
आयटी पार्कमधील रस्त्यांची दुरवस्था
हिंजवडी येथील आयटी पार्कमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यापूर्वी तात्परुती डागडुजी करण्यात आली होती; मात्र जोरदार पावसामुळे यातील मुरुम, माती निघून गेल्याने पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आयटीन्सकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एमआयडीसीकडून पांडवनगर परिसरातील काही खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे