पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : हिंजवडी परिसरात ट्रॅव्हल्सला आग लावून चौघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चालक जनार्दन हंबर्डीकर याला अटक केली आहे. वैद्यकीय उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच हिंजवडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला येत्या शनिवारी (२९ मार्च) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Hinjewadi Fire Case)
ही घटना १९ मार्च रोजी घडली होती. हिंजवडीतील फेज-२ एमआयडीसीत असलेल्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला चालकाने आग लावल्याचा आरोप आहे. दरम्यान, पोलिस तपासात आरोपी हंबर्डीकर याने दिवाळी बोनस न दिला गेल्यामुळे आणि पगार थकविण्यात आल्याच्या रागातून हा कट रचल्याचे समोर आले आहे.
कर्मचारी नेहमीप्रमाणे १९ मार्च रोजी सकाळी ट्रॅव्हल्स गाडीत बसले. दरम्यान, प्रवास सुरु असताना चालकाने अचानक गाडी थांबवून पेटवून दिली. गाडीच्या मागच्या दरवाजाला आतून अडसर ठेवल्याने कामगार बाहेर पडू शकले नाहीत. यात चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर सहाजण गंभीर जखमी झाले. आरोपीचाही यामध्ये पाय भाजला होता.
जखमी अवस्थेत असलेल्या आरोपीवर वैद्यकीय कस्टडीत उपचार सुरू होते. पोलिस त्याच्या डिस्चार्जची वाट पाहत होते. अखेर २६ मार्च रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.