

पिंपरी : महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आजअखेर 89 हजार नवीन मालमत्ताधारकांना मालमत्ताकराचे अंतिम बिल वाटप केले आहे. या मालमत्तांची एकूण 167 कोटी रुपयांची कर मागणी निश्चिती झाली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत 47 हजार 448 मालमत्ताधारकांनी 77 कोटीं कराचा भरणा केला आहे. उर्वरित 41 हजार 558 मालमत्तांधारकांकडे 87 कोटींचा कर येणे बाकी आहे. त्यांनी 31 मार्चपूर्वी कर न भरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
करवसुलीसाठी त्यांना एसएमएस, फोन, टेलिकॉलिंगद्वारे संपर्क साधला जात आहे. मालमत्ता सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरामध्ये ज्या नव्या मालमत्तांची आकारणी झाली आहे, अशा मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्ताकराचा तत्काळ भरणा करावा, असे आवाहन सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.
आत्तापर्यंत 30 हजार 440 मालमत्ताधारकांनी मालमत्ताकरावरील सवलतींचा लाभ घेतला आहे. सवलतीमध्ये ऑनलाइन स्वरूपात कर भरल्यास 5 टक्के, महिलांच्या नावे असलेल्या एका निवासी घरास 30 टक्के, दिव्यांग व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तेस 50 टक्के, झिरो वेस्ट आणि एसटीपी प्लँट कार्यान्वित असल्यास 10 टक्के, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास 2 टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये 3 ते 5 रेटिंग असणार्या मालमत्तांना 5 ते 10 टक्क्यांच्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे. जानेवारी 2025 पासून मालमत्ता कराचे प्रथमच बिल मिळाले आहे, अशा मालमत्तांना मालमत्ताकरावर विविध सवलती असून, त्यांनी 31 मार्चपूर्वीच कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा.
सर्वेक्षणानंतर नवीन आकारणी झालेल्या मालमत्तांना बिलांचे वाटप करण्यात आले आहे. या मालमत्ताधारकांकडून तब्बल 87 कोटींचा कर येणे बाकी असून, यापैकी काही मालमत्ता सवलतीस पात्र आहेत. बिल लागू झाल्यापासून तीन महिन्यांचा काळ पूर्ण झालेला नाही अशा मालमत्ताधारकांनी 31 मार्चपूर्वी कराचा भरणा करून सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.