पिंपरी: हिंजवडी आयटी पार्क परिसरातील दोन बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला. सायबर पोलिसांनी दोन कॉल सेंटरवर धाड टाकून मालक आणि मॅनेजर अशा चार जणांना अटक केली असून, 18 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक आरोपींना न्यायालयाने 18 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
स्काय हाय सोल्युशनचे मालक सागर कुमार यादव (32, रा. हिंजवडी), मॅनेजर आनंद पंकज सिन्हा (29, रा. वाघोली) यांच्यासह टेक लॉ सोल्युशनचे मालक धनंजय साहेबराव कासार (25, रा. माण, ता. मुळशी) आणि मॅनेजर हर्षद शंकर खामकर (28, रा. हिंजवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोन्ही कॉल सेंटरमधील एकूण 18 कर्मचाऱ्यांवरही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हिंजवडी परिसरात काही जणांकडून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून फसवणूक सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांना मिळाली. त्यानुसार सायबर पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट दोनची दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे (सायबर पोलिस ठाणे) आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार (गुन्हे शाखा युनिट दोन) यांच्या पथकांनी हिंजवडी फेज दोन येथील अनधिकृत कॉल सेंटरवर छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी दोन्ही कॉल सेंटरमधून महत्त्वाचे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून तपास सुरू आहे.
या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांना खोट्या नावांनी कॉल करत, आम्ही अमेरिकेतील मेडिकल हेल्थ डिपार्टमेंटमधून बोलतो, असा खोटा परिचय देत होते. काही औषधांमुळे कॅन्सर होऊ शकतो, असे सांगून संबंधित व्यक्तींकडून वैयक्तिक माहिती काढली जात असे. त्यानंतर त्या व्यक्तींना संबंधित औषध कंपनीविरोधात कोर्टात जाण्यासाठी मदत मिळेल आणि भरघोस नुकसानभरपाई मिळेल, असे आमिष दाखवून त्यांची माहिती अमेरिकेतील लॉ फर्मला विकली जात होती.
लॉ फर्मकडून मिळणाऱ्या कमिशनद्वारे या टोळीचा आर्थिक फायदा होत होता. स्काय हाय सोल्युशन कॉल सेंटरमधून अमेरिकेतील लोकांना फायनान्शियल कंपनीतून बोलत असल्याचे भासवून कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत होते. लिंकद्वारे पीडितांचा बँक तपशील मिळवून क्रेडिट स्कोर खराब असल्याचे सांगत, तो सुधारण्यासाठी गिफ्ट व्हाऊचर किंवा डॉलरच्या माध्यमातून रक्कम उकळली जात असल्याचे उघडकीस आले आहे.