Hinjewadi Shivajinagar Metro Line Launch Update
पंकज खोले
पिंपरी : महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा पहिला मोठा प्रकल्प म्हणून माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोकडे पाहिले जाते. सार्वजनिक व खासगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प विकसित केला जात आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा पीएमआरडीए अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते; मात्र अजून 9 टक्के काम अपूर्ण असल्याने हा प्रकल्प पूर्ण होण्यास पुढील वर्ष उजाडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे 91 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असल्याचा दावा पीएमआरडीएच्या वतीने करण्यात आला आहे. मेट्रो मार्गिकेसाठीच्या पुलाचे बांधकाम, तसेच रुळाचे कामही पूर्ण झाले आहे. 25 नोव्हेंबर 2021 मध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली, 2022 मध्ये प्रकल्पाचा पहिला पिलार उभा राहिला. 23.3 किलो मीटरच्या या मार्गिकेवर एकूण 23 स्थानके आहेत. मेट्रोचे दोन ट्रेन सेट देखील दाखल झाले असून, त्याची वेगवेगळया गतीनुसार चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. केंद्रातून आलेले अधिकारी, मेट्रोचे अधिकारी आणि अन्य काही तांत्रिक पथकाने याचे निरीक्षण केले आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च हा जवळपास 8,312 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हिंजवडी आयटी नगरी परिसरातील नित्याच्या वाहतूक कोंडीप्रश्नी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून दखल घेण्यात आली. त्यानुसार मुख्यमंत्री यांनी जुलै महिन्यात या संबंधितच सर्वच विभागाची बैठक घेतली होती. त्यामध्ये सर्वच शासकीय विभागासाठी सिंगल पॉइंट ऑथॉरिटी तयार केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांना त्याची देखरेख आणि आढावा घेण्याच्या सूचना केल्या. यातच वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने हिंजवडी-माण-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम डिसेंबर 2025 अखेर पूर्ण करून मेट्रोसेवा सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
मेट्रो प्रकल्पासाठीच्या वेगवेगळया परवानग्या, जागेचा ताबा, आणि इतर भूसंपादन प्रक्रियेस विलंब झाला. त्यामुळे प्रत्यक्षात मार्च 2025 पर्यंत प्रकल्पाची मुदत होती; परंतु ती वर्षभर वाढविण्यात आली. मेट्रो प्रकल्प कामाची गती वाढविणे अपेक्षित असताना, कामे वेळेवर झाली नाही. त्यामुळे मेट्रोला दोनवेळा नोटीस देण्यात आली होती. तद्नंतर कामाची गती वाढली.
मेट्रोच्या कामाची गती वाढली आहे. कामाचा वेळोवेळी आढावा देखील घेण्यात येत आहे. बांधकाम जवळपास सगळेच पूर्ण झाले आहे. तसेच, मेट्रोच्या कोचची प्रत्यक्ष तपासणी झाली आहे. स्थानकांचे काम बाकी आहे. शेवटचे काही टप्पे राहिले आहेत. ते देखील मुदतीत पूर्ण करण्यात येतील. लवकरच मेट्रो मार्गावर धावेल.डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
पिंपरी-चिंचवड व पुण्यातून हिंजवडीत ये-जा करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे; मात्र हिंजवडी परिसरातील रस्ते वाढत्या वर्दळीस अपुरे पडतात. त्यामुळे आयटी नगरी परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. त्यातच खराब रस्ते, पावसाळ्यात साचणारे पाणी यामुळे वाहतूक कोंडी आणखी भर पडून ‘आयटीयन्स’ला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. हा संताप त्यांनी अनेकदा संबंधित प्रशासनला, लोकप्रतिनधीसमोर व्यक्तही केला; मात्र त्याची कोणतीही दखल घेतली नाही. आता हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यास आयटीयन्सचा हिंजवडी-शिवाजीनगर हा प्रवास विनाअडथळा होणार आहे; मात्र हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी विलंब लागत असल्याने आयटीयन्सच्या नशिबी मेट्रोची प्रतीक्षा कायम आहे.
माण डेपो ते शिवाजीनगर अशी जवळपास 23 स्थानके आहेत. यापैकी 11 स्थानकांवर सरकते जिने आहेत. तसेच प्रतीक्षालय, आसन क्षमता, व्यापारी संकुल, वाहन पार्किंगची सुविधा आदी नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी 9 जिन्यांचे काम जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहेत. तर, 3 स्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे. 11 स्थानकांचे काम अपूर्ण असून, त्याला विलंब लागणार आहे.
पुणे मेट्रो लाईन 3 अर्थात हिंजवडी-माण- शिवाजीनगर या प्रकल्पाची मुदत चाळीस महिन्यांची होती. म्हणजेच हे काम 25 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. दरम्यान, मेट्रो व्यवस्थापनाकडून इओटी म्हणजेच एक्स्टेंशन ऑफ टाईम म्हणूण 543 दिवसांच्या वाढीव मुदतीचा प्रस्ताव पाठवला होता. म्हणजेच 25 फेबुवारीपर्यंत ती वाढीची मागणी होती. यानंतर पीएमआरडीए, पीआयटीसीएमआरएल आणि इंजनिअरिंग विभागाची बैठक झाली. यात 31 मार्च 2026 पर्यंत मुदवाढ दिली आहे.