पिंपरी: हिंजवडी, आयटी पार्कमधील नाल्यावर उभारण्यात आलेल्या डॉल्फीन कंपनीच्या बांधकामावर अखेर हातोडा पडला असून, नाल्यावरील ते बांधकाम काढून टाकण्यात येत आहे. पीएमआरडीएनंतर आता औद्योगिक विकास महामंडळानेदेखील बांधकामविरोधी कारवाईचा वेग वाढवला आहे. आयटी पार्कमध्ये पहिल्यांदा व्यापारी इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत जवळपास 56 हून अधिक अतिक्रमणे एमआयडीसीने काढली आहेत.
आयटी पार्कमधील नागरी समस्या सोडविण्यासाठी सर्वच विभाग एकत्रित आले आहेत. दरम्यान, पीएमआरडीएच्या कारवाईनंतर एमआयडीसीकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचे बोलले जात होते. आयटी पार्कजवळील डोहलर कंपनीजवळ नाला असून, या नाल्यावर बांधकाम करण्यात आले आहे; तसेच अन्य दोन ठिकाणीदेखील नाल्यावर बांधकामांना परवानगी देण्यात आली होती. (Latest Pimpri News)
दरम्यान, नैसर्गिक नाल्याचा प्रवाह रोखल्यामुळे या कंपनीला यापूर्वीच काम थांबविण्याची नोटीस दिली होती; मात्र पुढील कार्यवाही झाली नव्हती. अखेर कारवाई सुरू करण्यात आली. नाल्यावर अनधिकृत बांधकात हटवले जाणार असून, त्यानंतर नाल्याचा प्रवाह हा खुला करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांकडून कानउघाडणी
हिंजवडीतील नागरी समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने रस्त्यावर उतरलेले उपमुख्यमंत्री पवार यांनी एमआयडीसी अधिकार्यांना सुनावले होते. या ठिकाणी उपमुख्यमंत्री येण्यापूर्वीच जेसीबी, पोकलेन ठेवल्याची चर्चा परिसरात होती; मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नव्हती. अखेर आढावा बैठकीनंतर एमआयडीसीने तातडीने काम हाती घेतले.
‘पुढारी’च्या बातमीची दखलर‘
‘हिंजवडीत नाल्यावरील अडथळे हटेनात’ या मथळ्याखाली ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या कारवाईला वेग आला. सर्वेक्षणामुळे कारवाई थांबल्याचे सांगण्यात येत होते. पुढील कार्यवाही झालेली नव्हती. अखेर पहिल्यांदाच आयटी पार्क परिसरात या कंपनीचे नाल्यावरील काम काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे नाल्याचा प्रवाह आता खुला होईल.
नाल्यावरील संबंधित कंपनीचे बांधकाम तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ते काम पूर्ण होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत. त्यानंतर अन्य कंपन्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे. तसेच, रस्त्यावर व पदपथवार देखील अतिक्रमण होवू नयेत, याची दक्षता घेतली जाणार आहे.- राजेंद्र तोतला, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी.