पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरांत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले आहे. यामुळे जलमय रस्त्यातून मार्ग काढताना पादचार्यांसह वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वीच रस्त्यातील खड्डे, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, महावितरणने डीपी बॉक्स, भूमिगत केबल यांची देखभाल दुरुस्तीचे कामे न केल्याने यावर्षी उद्योगनगरीतील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. (Latest Pimpri News)
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे स्पाईन रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने पादचार्र्यांसह वाहनचालकांना प्रवास करताना अडथळा येत आहे. स्पाईन रोड ते आरटीओकडे जाणार्र्या रस्त्यापर्यंतच्या भागात निगडीकडून भोसरीकडे जाणार्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे.
स्पाईन रोडवरील पाण्याचा निचरा होण्यासाठी स्टॉर्मवॉटर लाईन आहे. परंतु, चेंबर रस्त्यापेक्षा वर किंवा चढावरती असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. जाधव सरकार चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने येथे तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे येथून प्रवास करताना वाहनचालकांना अडचण येत आहे. या चौकात मागील पंधरा दिवसांपूर्वी रस्ता खोदाई केली आहे. यावर अद्याप डांबरीकरण करण्यात आलेले नाही, यामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे.
भोसरी एमआयडीसीतील महत्त्वाच्या रस्त्यांवरदेखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. चिखली, कुदळवाडी परिसरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामुळे या रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कुदळवाडीतील डीपी रस्त्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. परंतु, अद्याप पूर्ण झालेले नाही. या रस्त्यावर एक ते दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. यात पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी रात्रीच्या वेळी दुचाकीचालकांना अपघात घडत आहेत. यामुळे या भागातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
सम्राट चौकात तुंबले ड्रेनेज
महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाकडे जाताना सम—ाट चौक लागतो. या चौकातून गेलेली ड्रेनेजलाईन दरवर्षी पावसात ओव्हरफ्लो होते. यंदादेखील अवकाळी पावसाने येथील ड्रेनेजलाईनचा चेंबरमधून मोठ्या प्रमाणावर मैलामिश्रित दूषित पाणी रस्त्यावर वाहत होते. परंतु, महापालिका प्रशासन येथील ड्रेनेजलाईन तुंबू नये, यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करत नसल्याने बुधवारपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे येथील ड्रेनेज पुन्हा ओव्हरफ्लो झाले आहे. महापालिका आयुक्त दररोज या मार्गाने ये जा करतात, त्याच मार्गावर ड्रेनेजलाईन साफसफाईची ही अवस्था आहे. तर शहरातील स्वच्छता आणि नालेसफाईबाबत नागरिकांत प्रश्न निर्माण होत आहे.