पिंपरी: पिंपरी- चिंचवड शहर परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच होती. सोमवारी सकाळी नऊ वाजता 82.5 मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला होता.
मावळ परिसरासही रविवारी रात्री पावसाने झोडपून काढले. वाढत्या जलसाठ्यामुळे मावळातील पवना धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात रविवारी रात्री ते सोमवार (दि. 15) सकाळी पावसाचा जोर कायम होता. (Latest Pimpri News)
कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे अनेक रस्त्यांची दुरवस्थाझाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
ऐन कामावर जाण्याच्यावेळी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. निगडी ते चिंचवड स्टेशन दरम्यान मेट्रोकामामुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. त्यातच पावसामुळे येथून वाहने नेताना मोठे त्रासदायक ठरते. मावळ परिसराही जोरदार पावसाने झोडपून काढले; मात्र सोमवार सकाळपासून पावसाचा जोर ओसरला होता.