पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात सोमवार (दि. 18) पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास पंधरा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शहरवासीयांना भिजवून टाकले. काल 29 मि.मी. पावसाची नोंद झाली.
गेली तीन ते चार दिवस अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता. काल दुपारी बारानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. इतक्या दिवस पावसाच्या विश्रांतीमुळे बाहेर पडलेल्या बहुतांश नागरिकांकडे रेनकोट व छत्री नसल्याने फजिती झाली. दुचाकीस्वार आणि पादचारी यांना पावसाने ओलेचिंब करून टाकले. काहीजणांनी पाऊस थांबण्याची वाट पाहत आडोसा शोधला. (Latest Pimpri News)
शहरामध्ये पावसामुळे खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. जून - जुलै महिन्यात केलेल्या वरवरच्या डागडुजीनंतर खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जुन्या पोलिस आयुक्तालयाजवळ चिंचवड स्टेशनकडे जाणार्या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहने नेमकी चालवायची कुठून, हा प्रश्न वाहनचालकांना पडतो.
तसेच चिंचवडगावातील बसस्थानकापासून एल्प्रो मॉलकडून लिंक रोडकडे जाणार्या चौकातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याठिकाणी चारही बाजूने वाहने ये - जा करत असतात; तसेच येथे सिग्नलही नाही. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ होते.
चिंचवडेनगर याठिकाणी डंपरने माती व चिखल वाहून नेण्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावर चिखल पडून पावसामुळे रस्ते घसरडे झाले आहेत. पाऊस थांबल्यानंतर चिखल वाळून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य होते.
पावसामुळे रस्त्यावर सखल भागात पाणी साचते. त्यामुळे पाण्यातून वाहने चालविताना वाहनचालकांची आणि रस्त्याने जाताना पाण्यापासून बचाव करताना पादचार्यांची कसरत होत होती.पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली होती. मध्येच पावसाला जोर चढत असल्याने नागरिक रेनकोट व छत्री असूनही अर्धेनिम्मे भिजले होते.