पिंपरी: गहूंजे येथील उच्चभ्रू लोकवस्ती समजल्या जाणाऱ्या लोढा सोसायटीमध्ये किरकोळ वादातून अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मावळातील सराईत गुन्हेगार किशोर भेगडे याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
किशोर भेगडे हा मावळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या बापू भेगडेंचा पुतण्या असून त्याच्या विरोधात यापूर्वीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास लोढा सोसायटीतील क्लब हाऊस परिसरात घडली. (Latest Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर भेगडे याचा मुलगा आणि त्याचे काही मित्र क्लब हाऊसमध्ये खेळत असताना किरकोळ वाद झाला. हा प्रकार भेगडे याच्या लक्षात येताच त्याने संतापाच्या भरात मुलाच्या मित्रांना गाठले आणि त्यांना अक्षरश: बेदम मारहाण केली.
या मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओत एका १५ वर्षीय मुलाच्या पोटात भेगडेने मारलेला जोराचा मुक्का स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकारानंतर मुलाच्या नातेवाईकांनी शिरगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि किशोर भेगडे याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार (जीवे मारण्याचा प्रयत्न) गुन्हा दाखल केला.
या घटनेमुळे सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्चभ्रू भागात मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादावरून एका सराईत गुन्हेगाराने थेट मुलांवर हात उचलणे, त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणे ही अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक असल्याचे मत सोसायटीधारक व्यक्त करत आहेत. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.