LPG Gas Pudhari
पिंपरी चिंचवड

Gas Cylinder Shortage: आखाती युद्धाचा परिणाम; पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाई, सिलिंडर काळ्या बाजारात महाग

व्यावसायिक गॅसपुरवठा ठप्प; हॉटेल, उद्योग अडचणीत, घरगुती सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: आखाती देशांमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसपुरवठ्यावर मोठा ताण आला असून, देशभरात त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. घरगुती आणि व्यावसायिक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने आता घरगुती सिलिंडरसाठीही नागरिक रांगा लावत आहेत. पुरवठ्याअभावी शहरातील हॉटेल, खाणावळी बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे; तसेच गॅसअभावी एमआयडीसीतील छोटे उद्योगही अडचणीत आले आहेत.

या युद्धामुळे जागतिक पातळीवरील निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाचा परिणाम आता पिंपरी-चिंचवड शहरात स्पष्टपणे जाणवू लागला आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने शहरात गॅसचा काळाबाजार सुरू झाल्याचे चित्र आहे. 916 रुपयांना मिळणारा घरगुती 14 किलोचा सिलिंडर सध्या काळ्या बाजारात दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे, तर 1,800 रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर अधिकृतपणे उपलब्ध नसल्याने काही व्यावसायिक तो 4,500 ते 5,000 रुपयांपर्यंत खरेदी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

गॅसचा नियमित पुरवठा ठप्प झाल्यामुळे उद्योग, हॉटेल व्यवसाय, खानावळी, आयटी कंपन्यांतील कँटीन तसेच लघुउद्योगांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी महागड्या दराने सिलिंडर खरेदी करून कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत असला तरी उपलब्ध साठा मर्यादित असल्याने पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या गॅस सिलिंडर पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक उद्योगांना महागड्या दराने सिलिंडर खरेदी करावे लागत आहेत. गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्यास उत्पादन थांबण्याची शक्यता असून हजारो कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होऊ शकतो.

युध्दाच्या परिस्थितीचा परिणाम आता भारतासह महाराष्ट्राच्या ग््राामीण भागातही झालेला आहे. सध्याची परिस्थती अशी झाली आहे की, गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नाही. सिलिंडर संपल्यास जेवण कशावर बनवायचे.
छाया रदवे, गृहिणी
सिलिंडरचे बुकिंग केलेले आहे; परंतु टाकी कधी मिळेल, याविषयी सांगता येत नाही. सध्या युद्ध परिस्थितीमुळे भीतीपोटी अनेक नागरिक सिलिंडरची बुकिंग करू लागले आहेत. परिणामी गरजू लोकांना वेळेवर सिलिंडर मिळविण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे
वैशाली हुले, गृहिणी
युद्धामुळे अचानक घरगुती गॅसचा प्रश्न निर्माण झालेला आहे; परंतु अशा परिस्थितीत सर्वांनी गॅसचा जपून वापर केला पाहिजे. कमीत कमी इंधनावर तयार होणाऱ्या अन्नपदार्थांचे आपण सेवन करुन या परिस्थितीवर मात केली पाहिजे.
सुजाता गोरडे ,गृहिणी
बुकिंग करूनदेखील वेळेत गॅस मिळत नाही. यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे
ज्योती जगताप (गृहिणी)
युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती सिलिंडरसाठी वेटिंग पीरियड आहे. कोळसा शेगडी किंवा इलेक्ट्रिक शेगडी असा पर्याय तयार ठेवावा लागणार आहे. या कठीण परिस्थितीमध्ये नागरिकांना धैर्य ठेवण्याचे गरजेचे आहे
शोभा बंब (गृहिणी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT