पिंपरी: गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे सजावटीच्या वस्तूंनी सध्या बाजारपेठेत बहार आणली आहे. यंदाच्या वर्षी लायटिंगच्या वैविध्यपूर्ण माळा व दिवे बाजारात आले आहेत. तसेच गणपतीच्या मागे लावण्यासाठी आकर्षक देशी एलईडी अक्षरे व नावेदेखील उपलब्ध आहेत.
गणेशोत्सवासाठी विविध प्रकारच्या लायटिंगच्या माळा, लाइटची कृत्रिम फुले, लाइटच्या समई, एलईडी बसविलेली तोरणे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. लाईटसच्या प्रकारांमध्ये यंदा वैविध्य पाहायला मिळते. यात रंगीबेरंगी थ्रेड बॉल, मेटलचे वेगवेगळ्या आकारांतील लाईट्स बाजारात दाखल झाले आहेत. याच्या किंमती साधारण 300 रुपयांपासून सुरू आहेत. (Latest Pimpri News)
100 रुपयांपासून लायटिंगच्या माळा
थ्रेड बॉल प्रकारांत रंगांचे वेगळेपण असल्याने यांना चांगली मागणी आहे. तर, मेटलच्या डिझायनर लायटिंगमध्ये स्टार, गोलाकार, बदाम असे आकर्षक आकार पाहायला मिळत आहेत. या सोनेरी आकारातील मेटल लाईट यंदा भाव खाऊन जात आहेत. लायटिंग माळा 100 ते 125 रुपयांपासून उपलब्ध आहेत. लाइटच्या माळांमध्ये फुले, सोनेरी कागद आणि सजावटीचे साहित्य टाकून एकत्रित अशी माळदेखील बाजारात उपलब्ध झाली आहे.या वेळी जास्वंदीच्या फुलांची लायटिंगची माळ हा वेगळा प्रकार बाजारात विक्रीस पहायला मिळत आहे.
झुंबर व लाईटच्या समईसारखे प्रकार
यंदा गणेशोत्सवामध्ये विविध प्रकारचे आकर्षक झुंबरदेखील उपलब्ध आहेत. छोट्या आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यांची किंमत दिडशे रुपयांपासून सहाशे रुपयांपर्यंत आहे. यामध्ये समई सारखे प्रकारदेखील उपलब्ध आहेत.
लाईटचे कारंजे
लाईटचे रंगबेरंगी कारंजे हे देखील उपलब्ध आहेत. घरगुती सजावटीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याला पूर्ण काचेचे आवरण असल्याने धोक्याची शक्यता नाही. छोट्या आकारातील हे आकर्षक कारंजे लक्षवेधी ठरत आहे.
एलईडी अक्षरे
दरवर्षीप्रमाणे एलईडीमधील अक्षरेदेखील उपलब्ध आहेत. यामध्ये लाडका देवबाप्पा, गणपती बाप्पा मोरया अशी विविध अक्षरे उपलब्ध आहेत. डेकोरेशनसाठी हा उत्तम पर्याय आहे.