वर्षा कांबळे
पिंपरी: काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणच्या स्टॉलवर गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा शहरात नावीन्यपूर्ण अशा ड्रेपरी घातलेल्या गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत.
दरवर्षी गणेशमूर्ती तयार करतानाच मातीचे उपरणे, पितांबर, शेला, फेटा अशा स्वरूपात तयार करून त्यांना रंगरंगोटी केली जाते. यंदा कापडी पोशाखातील या मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये मॅचिंग फेटा आणि पितांबर असे कॉम्बिनेशन असल्यामुळे मूर्ती अधिकच आकर्षक दिसत आहेत. (Latest Pimpri News)
3500 पासून 25 हजारांपर्यंत मूर्ती
साधारणत: दीड फुटापासून ते पाच फुटांपर्यंत या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. दीड फुटाच्या गणेशमूर्तीची किमंत 3500 रुपये आहे. तर, पाच फुटांच्या मूर्तीची किंमत 25 हजारांपर्यंत आहे. या मूर्तींवर विविधरंगी, जरतारी, खडे, कुंदन व टिकल्यांचा वापर करून सुंदर पोशाख तयार केला आहे. यावर उपरणे, टोपी, शाल, शेला अशी कापडी वस्त्रे असल्याने मूर्ती अधिकच खुलून दिसतात.
पेणच्या मूर्तींना पसंती
यावर्षी शहरात लवकर स्टॉल्स लागल्यामुळे मूर्तीची निवड करण्यासाठी नागरिकांना मोठा अवधी मिळणार आहे. महिना आधीच भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतात. सध्या कुंभारवाड्यात व कारखान्यात तयार झालेल्या गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल होऊ लागल्या आहेत. काही ठराविक स्टॉल्सवर पेणच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या जातात. या मूर्ती सुबक आणि आकर्षक असतात. म्हणून ग्राहकांचीदेखील पसंती मिळत आहे.
राजस्थानच्या मूर्तीही बाजारात
शहरात राजस्थानी कलाकारांनी घडविलेल्या मूर्ती विक्रीस येतात. या मूर्ती खूप स्वस्त असल्यामुळे नागरिकांचा ओढा तेथून मूर्ती घेण्याकडे वाढला आहे. त्याचा परिणाम शहरातील व्यावसायिकांवर होताना दिसत आहे. या मूर्ती दिसायला सुबक आणि किंमतीला कमी असतात. त्यामुळे या मूर्तींना जास्त मागणी असते. साधारणत: दीड ते तीन फुटांपर्यंतच्या घरगुती मूर्ती स्टॉल्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
आम्ही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ड्रेपरी घातलेल्या गणेशमूर्ती बनवित आहोत. आम्ही फक्त तयार मूर्ती घेवून कारखान्यात ड्रेपरी आणि सजावटीचे काम करतो. अजून काही नावीन्यपूर्ण मूर्ती बाजारात येत्या काही दिवसांत येतील.- सुरेश धोत्रे, मूर्ती व्रिकेते