cyber fraud news : पिंपरी : ‘दहा मिनिटांत श्रीमंत व्हा !’, ‘दररोज 100 डॉलर कमवा !’, ‘20 टक्के हमखास नफा मिळवा !’, अशा मोहक वाक्यांच्या जाळ्यात अडकून अनेकजण लाखो रुपये गमावत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवशी अशा फसवणुकीच्या दोन घटना उघड झाल्या असून यामध्ये तब्बल 1 कोटी 15 लाख रूपयांना गंडा बसला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रावेत येथे घडलेल्या पहिल्या प्रकरणात, एका नागरिकाला अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. त्या व्यक्तीने बिटकॉइन आणि युएसडीटी या डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दररोज 100 डॉलर नफा मिळेल, असे आमिष दाखवले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी काही बनावट व्यवहार दाखवण्यात आले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला एक लिंक पाठवून नफ्याच्या रकमेतून 20 टक्के कमिशन भरण्याची अट ठेवली. आरोपीने वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले आणि एकूण 96 लाख 93 हजार 289 रुपये उकळले. मात्र, एकदा पैसे जमा झाल्यावर आरोपीने संपर्क तोडला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.
तळेगाव दाभाडे येथे घडलेल्या दुसर्या प्रकरणात, राकेश चौधरी यांच्याशी आरोपी महिलेने संपर्क साधला. आर्या फायनान्स अलायन्स या कंपनीत गुंतवणूक केल्यास 20 टक्के नफा मिळेल, असे सांगून त्यांना एका व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. तिथे इतर सदस्यांनी मोठ्या नफ्याच्या बनावट चॅट्स आणि मेसेजेस पाठवले. चौधरी यांच्या नावाने एका बनावट खात्यात 70 ते 80 लाख रुपये जमा झाल्याचे दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. चौधरी यांनी 18 लाख 12 हजार रुपये गुंतवले. मात्र, नफा मिळणे दूरच राहिले, उलट गुंतवलेली रक्कमही परत मिळाली नाही. आरोपीने नंतर चौधरी यांच्याशी संपर्क तोडला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.
फुकटचा नफा मिळतो, असे कुठेही सांगितले गेले तर नागरिकांनी ताबडतोब सावध व्हावे. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी त्या कंपनीची विश्वासार्हता तपासावी. झटपट पैसा मिळवण्याच्या मोहात पडल्यास आयुष्यभराची कमाई गमावण्याचा धोका असतो. अशा संशयास्पद गुंतवणूक योजनांच्या आहारी न जाता पोलिसांची मदत घ्यावी.रविकिरण नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.
झटपट श्रीमंतीचे आमिष
सुरुवातीला बनावट नफ्याचे दाखले
व्हॉट्सअॅप व सोशल मीडियावर बनावट यशस्वी गुंतवणूकदारांचे संदेश
गुंतवणुकीची रक्कम वाढवण्याचा आग्रह
एकदा पैसे जमा झाल्यावर आरोपी गायब होणे.
अनोळखी लिंक किंवा कॉलवर विश्वास ठेवू नका.
उच्च परताव्याचे आमिष दाखवणार्या कोणत्याही ऑफरपासून सावध राहा.
केवळ सरकारमान्य, अधिकृत संस्थांमध्येच गुंतवणूक करा.
गुंतवणुकीपूर्वी स्वतः संशोधन करा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.
संशयास्पद गुंतवणूक प्रकरणांची तातडीने सायबर पोलिसांना माहिती द्या.
सायबर गुन्हेगार सुरुवातीला ‘झटपट नफा’, ‘उच्च परतावा’ अशा आकर्षक वचनांनी विश्वास संपादन करतात. त्यानंतर बनावट व्यवहार दाखवले जातात आणि नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करून मोठी रक्कम गोळा केली जाते. एकदा मोठा व्यवहार झाला, की फसवणूक करणारे आरोपी अचानक गायब होतात. आरोपीचे मोबाईल नंबर बंद, तर लिंक निष्क्रिय होते