

Google ने आपल्या 3 अब्ज वापरकर्त्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. एका नव्या आणि अतिशय धोकादायक सायबर हल्ल्यामुळे Gmail वापरकर्त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. या हल्ल्यात Gmail च्या तांत्रिक त्रुटी आणि सोशल इंजिनीयरिंग तंत्रांचा वापर करण्यात आला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अफवांचा पूर आला आणि Google ला तात्काळ सुरक्षा अपडेट जाहीर करावा लागला.
(Cyber Security Tips 2025)
Ethereum चा विकसक निक जॉन्सन या सायबर हल्ल्याचा बळी ठरला. त्याने सांगितले की, त्याला Google कडून एक ईमेल मिळाला, ज्यामध्ये म्हटले होते की त्याच्या खात्यावर कायदेशीर नोटीस जारी करण्यात आली आहे. ईमेल no-reply@google.com वरून आले होते आणि ते एकदम खरे वाटत होते. Gmail नेदेखील ते एक सामान्य सुरक्षा अलर्ट म्हणून दर्शवले.
खरं तर हॅकर्सनी Google च्या प्रणालीतील त्रुटींचा फायदा घेतला आणि स्वतःलाच वैध ईमेल पाठवून, नंतर ते इतर वापरकर्त्यांकडे फॉरवर्ड केले. त्यामागील उद्दिष्ट वापरकर्त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स चोरणे होते.
Google ने सांगितले की, "आम्हाला अशा टार्गेटेड हल्ल्यांची कल्पना आहे आणि गेल्या आठवड्यापासून आम्ही सुरक्षा उपाय राबवत आहोत." त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, वापरकर्त्यांनी आता पासवर्ड वापरणे थांबवावे आणि त्याऐवजी पासकी वापरावी.
आजच्या काळात पासवर्ड आणि SMS द्वारे मिळणाऱ्या 2FA (दोन-चरणीय पडताळणी) ला हॅक करणे सोपे झाले आहे. हॅकर्स पासवर्ड चोरून इतर डिव्हाइसवरून SMS कोड वापरून लॉगिन करू शकतात. परंतु पासकी फक्त त्या डिव्हाइसवरच कार्य करते ज्यात वापरकर्त्याचे सुरक्षा संकेत (जसे की फिंगरप्रिंट किंवा पिन) जोडलेले असते.
आपल्या Gmail खात्यावर पासकी जोडा.
SMS ऐवजी Google Authenticator किंवा डिव्हाइस-आधारित पडताळणी वापरा.
पासवर्डच्या जागी Google Prompt वापरा – हे अधिक सुरक्षित आणि सोपे आहे.
Google कधीही थेट सुरक्षा समस्यांबाबत ईमेल करत नाही.