पिंपरी: गणेशोत्सव व त्यानंतर येणारे नवरात्र सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई व खव्याच्या पदार्थाची मोठी मागणी असते. प्रसादाला तसेच, नैवेद्यासाठी मिठाई वापरली जाते. या काळात मिठाई, खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून भेसळयुक्त पदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जातात.
त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली असून, गेल्या पंधरा दिवसांत पुणे जिल्ह्यात 35 ठिकाणी तपासणी केल्या आहेत. तर, 62 नमुने ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली. (Latest Pimpri News)
राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह बुधवार (दि. 27) साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, या दिवशी ग्राहकांना शिळे, भेसळयुक्त मिठाई माथी मारली जाते. यासाठी अन्न व औषध प्रशासाने प्रत्यक्षात टोल फ्री क्रमांक दिला आहे.
त्या अनुषंगाने संबंधितावर कारवाई होत असते. प्रामुख्याने पॅकबंद गोड पदार्थाची अधिक काळजी घेणे महत्वाचे असते. दुकानदारांना त्याबाबत सूचनादेखील देण्यात येते. तसेच, त्या मिठाईवर तारीख व टिकवण्याचा कालावधी नमूद केला जातो. दरम्यान, केवळ मिठाईच नाही तर, कच्चा पदार्थमध्ये देखील मोठया प्रमाणात भेसळ केली जाते. त्यात पनीर, खवा याचप्रामणे रिफाइंड तेल, तुप याची तपासणी करणे गरजेचे असते.
यापूर्वी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एफडीएच्या विभागाने विविध ठिकाणी तपासणी केली होती. त्यानंतर आता गणेशोत्सव व त्यापाठोपाठ नवरात्र सणाच्या निमित्ताने ही तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. यात बाजारपेठेतील मिठाई दुकाने, दुधाचे पदार्थ विकणारे विक्रेते,धान्य दुकानदार तसेच, स्टॉल आणि खाद्यपदार्था गाड्यांंचीदेखील तपासणी होणार आहे. त्यासाठी दुकानदारांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करावी लागेल, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, नागरिकांनी देखील असे काही आढळल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
..तर हेल्पलाईनवर करा तक्रार
पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात दैनंदिन तपासणी सुरू असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने ती आणखी तीव्र केली आहे. नागरिकांना देखील मिठाईमध्ये भेसळ अथवा तारखेच्या पुढे पदार्थ विकत असल्यास त्यासाठी पुढे यावे, प्रशासनाचा 1800222365 यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यावर निश्चित कारवाई करण्यात येणार आहे.
गणेश मंडळांनी अशी घ्या काळजी
भाविकांचा प्रसाद काचेच्या किंवा पारदर्शक भांड्यात ठेवावा. त्यावर झाकण ठेवावे
ताजा प्रसाद द्यावा. तो त्याच दिवशी वाटण्यात यावा
मंडळांनी मंडपाशेजारी कचराकुंडी ठेवावी. जेणेकरुन परिसर स्वच्छ राहील
प्रसाद स्वतः तयार करुन भाविकांना वितरीत करणार असल्यास त्यापूर्वी एफओएससीओसी या ठिकाणी नोंद करावी व तसे प्रमाणपत्र प्राप्त करावे
कच्चा अन्न पदार्थाची खरेदी बिले बाळगावीत, परवानाधारक दुकानाकडून ते खरेदी करावे
दैनंदिन तपासणी सुरु असून, उत्सवाच्या काळात ती आणखी तीव्र करण्यात येत आहे. 11 ऑगस्टपासून 62 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. त्याच अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीदेखील तक्रारीसाठी पुढे यावे.- सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन