पिंपरी: बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला मिळवून पंतप्रधान आवास योजनेतील फ्लॅट लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या व्यक्तीने एजंटच्या मदतीने कागदपत्रे तयार करून पीएमआरडीएची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हा प्रकार २१ मे २०२१ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत भोसरीतील सेक्टर क्रमांक १२ येथील व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्थेत घडला.
याप्रकरणी पोलिस शिपाई अशोक भोगल यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद दानिश अब्दुल माजिद शेख (४५, रा. भोसरी), त्याची पत्नी आणि एजंट इरफान शेख (रा. खराळवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद दानिश याचा जन्म उत्तर प्रदेशात झाला आहे. मात्र, महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे दाखविण्यासाठी त्याने खडकी येथील एका कॉलेजचा बनावट शाळा सोडल्याचा दाखला तसेच वडिलांचा शाळा निर्गम उतारा एजंटमार्फत तयार करून घेतला. या कागदपत्रांच्या आधारे हवेली तहसील कार्यालयातून महाराष्ट्राचा रहिवासी दाखला मिळवला.
त्यानंतर या दाखल्याचा वापर करून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पीएमआरडीएकडून व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्थेतील फ्लॅट क्रमांक ९०४ स्वतःच्या नावावर मिळवला. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय योजनेचा लाभ घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.