संतोष शिंदे
पिंपरी: तुम्ही तुमच्या दुकानातील रोकड बँकेत जमा करत आहात का, तर मग जरा सावध राहा. कारण, रोख रकमेच्या बंडलमध्ये जर पाच किंवा त्याहून अधिक नकली नोटा आढळल्या, तर बँकेने थेट फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीने नकली नोटा जाणीवपूर्वक दिल्या आहेत की नाही, हे तपासाअंती स्पष्ट होणार असले तरी, तोपर्यंत नोटा जमा करणार्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजर्यात उभे राहावे लागणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये नुकताच असा एक प्रकार उघडकीस आला असून, एका ज्वेलर्सच्या रोकडमध्ये 500 रुपयांच्या सहा बनावट नोटा आढळल्याने संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pimpri News)
धीरज राठोड यांनी आपल्या ज्वेलर्स दुकानातील रोकड जमा करण्यासाठी ही रक्कम बँकेत दिली. कॅश स्वीकारताना बँक कर्मचार्यांनी नोटांची तपासणी केली. त्यामध्ये 500 रुपयांच्या सहा नकली नोटा असल्याचे निष्पन्न झाले.
बँकेने तातडीने ही माहिती वरिष्ठांना दिली आणि त्यानंतर निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. याप्रकरणी शिरीष जसवंतराव देशमुख (41, रा. रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धीरज राठोड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणत्याही बँकेला एका व्यवहारात जर पाच किंवा त्याहून अधिक नकली नोटा आढळल्या, तर त्या व्यक्तीविरोधात पोलिस ठाण्यात तात्काळ एफआयआर दाखल करणे बंधनकारक आहे. यापूर्वी बँका केवळ अशा नोटांची नोंद ठेवत असत, ग्राहकाकडून स्वाक्षरी घेऊन रजिस्टरमध्ये नोंद करत होत्या; मात्र आता हे धोरण पूर्णतः बदलण्यात आले असून, बनावट चलनविरोधातील कारवाई अधिक कठोर करण्यात आली आहे.
बँकेच्या पातळीवरही या प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि कठोर करण्यात आले आहे. बँक कर्मचार्यांना नकली नोटा सापडल्यानंतर ‘र्उेीपींशीषशळीं’ असा शिक्का मारून नोट वेगळ्या बंडलमध्ये ठेवावी लागत आहे; तसेच ग्राहकाकडून याबाबत जबाब नोंदवून घेतला जातो. जर पाचपेक्षा जास्त नोटा असतील, तर त्या नोटा पोलिसांना सुपूर्द केल्या जातात. त्यानंतर संबंधित एफआययू यांना माहिती दिली जाते.
आरबीआयचा नवीन नियम काय सांगतो
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार ग्राहकाने 1 ते 4 पर्यंत नकली नोटा जमा केल्यास त्याची नोंद घेऊन संबंधित नोटा तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवणे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त नोटा आढळल्यास त्या व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम 176 (बनावट चलन वापरणे) आणि कलम 177 (खोट्या नोटा जवळ बाळगणे) अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदवणे. याशिवाय, आता कलम 316(1) (फसवणूक) आणि कलम 62 (कट कारस्थान) अंतर्गतही कलमे लागू होऊ शकतात.
तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य
नकली नोटांबाबतच्या नव्या नियमांमुळे व्यापार्यांसह रोख व्यवहार करणार्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः मोठ्या रक्कमेच्या व्यवहारांमध्ये नोटा स्वीकारताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आता अनिवार्य ठरत आहे. यासाठी यूव्ही लाइट, मार्कर पेन किंवा नोट डिटेक्टर मशिनसारख्या उपकरणांचा वापर करून नोटांची खातरजमा करावी, अशी शिफारस करण्यात येत आहे.
बँकेने दिलेल्या माहितीवरून सहा बनावट नोटांची नोंद घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. आरोपी धीरज राठोड याच्याकडून या नोटा नेमक्या कुठून आल्या, हे तपासले जात आहे. त्यांनी त्या नकली असल्याचे जाणूनही जमा केल्या का, हा तपासाचा भाग आहे. आता एकाच वेळी पाचपेक्षा जास्त नकली नोटा आढळल्यास कायदेशीर कारवाई करणे बंधनकारक असल्यामुळे हा गुन्हा नोंदवला आहे.- महेश बनसोडे, निगडी पोलिस ठाणे, पिंपरी- चिंचवड.
देशात नकली चलनविरोधातील कारवाई आता अधिक तीव्र होत असून, रिझर्व्ह बँकेने बँकांवर आणि ग्राहकांवरही कायदेशीर जबाबदारी स्पष्टपणे सोपवली आहे. परिणामी, एखाद्या कॅश बंडलमधील पाच खोट्या नोटा आता तुम्हाला कोर्टकचेर्यांपर्यंत घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या कॅश बंडलमधील प्रत्येक नोट खरी आहे ना, याची खातरजमा करूनच बँकेत जमा करणे गरजेचे आहे.- समिक्षित शेडगे, व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पिंपरी- चिंचवड.
दुकानात अनेक ग्राहकांकडून रक्कम जमा होते. व्यापारी अनेकांशी मोठ्या प्रमाणावर व्यवहार करतात. सर्व नोटा तपासण्याची अनेकांकडे यंत्रणा नाही. त्यामुळे नकली नोटा आमच्याकडून बँकेत जात असल्या तरी आम्ही ते जाणूनबुजून करत नाही. त्यामुळे थेट गुन्हा दाखल करून व्यापार्यांना आरोपींच्या पिंजर्यात उभे करणे अन्यायकारक आहे.- सचिन निवंगुणे, संस्थापक/ अध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ.