वडगाव मावळ: मावळ तालुक्यात आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जे येतील त्यांना सोबत घेऊन महायुतीच्या माध्यमातून लढवू, जे येणार नाहीत त्यांच्याविरोधात महायुतीने लढू, असे स्पष्टीकरण आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.
नेते बदलले तरी भाजप कार्यकर्ते सोबत
या वेळी आमदार शेळके यांनी बोलताना तालुक्यात येत्या चार महिन्यांत होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, तळेगाव दाभाडे व लोणावळा नगर परिषद, वडगाव नगरपंचायत या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचे स्पष्ट करत जे सोबत येतील त्यांना घेऊ, जे येणार नाहीत त्यांच्याविरोधात महायुती राहील, असेही स्पष्ट केले. (Latest Pimpri News)
महायुतीचा धर्म पाळताना भाजपच्या नेत्यांनी भूमिका बदलली तरी सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्याबरोबर होता, त्यामुळे त्यांना सोबत घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. विठ्ठलराव शिंदे यांनीही जे येतील त्यांना बरोबर घेऊन जे येणार नाही त्यांना सोडून पुढे जायचे आहे, असे मत व्यक्त करत येत्या निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवायची वेळ आली आहे, असे सांगितले.
गणेश ढोरे म्हणाले, की विधानसभेप्रमाणे तितक्याच ताकदीने आगामी निवडणुका लढवायच्या आहेत. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले ज्यांच्यामुळे आपण आहोत, त्या कार्यकर्त्यांना बळ देण्याची आता वेळ आली आहे.
तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. पाच वर्षे आपण कार्यकर्त्यांना राबवून घेतले त्यांनीही त्यांचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळे आता त्यांना ताकद द्यावी, असे आवाहन केले.
कोअर कमिटीशिवाय कुठलाही निर्णय नाही
तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी आगामी काळात विभाग व शहर पातळीवर प्रत्येकी 20 जणांची कोअर कमिटी केली जाणार असल्याचे सांगून त्या भागातील किंवा शहरातील कोणताही निर्णय, विकासकामे ही संबंधित कोअर कमिटी शिवाय घेऊ नये, असे आवाहन केले. यावर बोलताना आमदार शेळके यांनी कोअर कमिटीचा निर्णय स्वतः मलाही मान्य असेल, असे स्पष्ट करून उद्या ज्यांना या कमिटीचा निर्णय मान्य होणार नसेल त्यांनी आजचा आपला मार्ग शोधावा, असेही स्पष्ट केले. पदाधिकारी निवड, शासकीय कमिटी नियुक्त्या, उमेदवारी, पक्षप्रवेश, विकासकामे याबाबतचेनर्णय घेण्याचे सर्व अधिकारीकोअर कमिटीला राहतील,असेही सांगितले.
आप शुरुवात करोगे तो एंड मैं करूंगा
आमदार शेळके यांनी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या काही पदाधिकार्यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना ज्यांना अजित पवारांचे नेतृत्व मान्य नाही त्यांना खुशाल घ्या, पण जे अजित पवारांचे नेतृत्व मानतात पण त्यांना काही आमिषे दाखवून प्रवेश देण्याचा प्रयत्न करून सुरुवात तुम्ही केली तर शेवट मी करील, असाही इशारा दिला.