पिंपरी: गणेशोत्सव जवळ आल्याने बाजारात या उत्सवाच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. घरगुती गणपतीच्या सजावटीत मखर हा अविभाज्य भाग. गणेशोत्सव जवळ येताच आकर्षक मखर खरेदी करण्याकडे गणेशभक्तांचा कल असतो. थर्माकोलच्या बंदीमुळे बाजारात इकोफ्रेन्डली मखर घेण्याकडे भाविकांचा कल दिसून येत आहे. यामध्ये लाकडी, कापडी, फोमशीट, पुठ्ठ्यांपासून बनविलेल्या मखरांना पसंती आहे.
बाजारात ठिकठिकाणी वेगवेगळ्या आकारातील मखरांची दुकाने दिसायला सुरुवात झाली आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून मखर तयार करण्यावर भर देण्यात आलाय. साधारणत: 700 ते 7 हजार रुपयांपर्यंत मखरांची किंमत आहे.(Latest Pimpri News)
फोमशीटचे मखर
फोमशीटपासून तयार केलेले रेडिमेड व फोल्ड करता येणारी विविध सुंदर मखरे बाजारात उपलब्ध आहेत. विविध मंदिरे, किल्ले, गड यांच्या प्रतिकृती असलेल्या खडे, आरसे व टिकल्यांनी सजविलेल्या आणि लाईटचा वापर केलेली मखरेदेखील उपलब्ध आहेत.
मखरामध्ये सजावटीबरोबरच लाईटचे दिवे असल्याने भाविकांना घाईच्या वेळी वेगळी विद्युत रोषणाई करण्याची गरज नाही. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून मखर तयार करण्यावर भर देण्यात आलाय. साधारणत: 1 ते 15 हजार रुपयांपर्यंत मखरांची किंमत आहे.
लाकडी मखर
कलाकारांनी व स्थानिक विक्रेत्यांनी गणरायाच्या उत्सवासाठी लाकडापासून मखर तयार केले आहेत. त्याभोवती कापडाची आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. पातळ लाकड्याच्या पट्ट्या जोडून कापड किंवा नुसती फुलांची देखील सजावट केली जाते. तर काहीवेळा झुरमुळ्या आणि कुंदन व टिकल्यांचा वापर करून सुरेख मखर तयार करण्यात आले आहेत.
कापडी मखर
कापडाला झालर, लेख, टिकल्या, मणी यांचा वापर केलेली दोन ते सहा फुटापासून सहा फुटांपर्यंत ही कापडी मखरे उपलब्ध आहेत. ही मखरे घडी करून ठेवता येणार्यासारखी व वॉशेबल आहेत.
कार्डबोर्ड, पुठ्ठ्यांपासून बनविलेले मखर
आकर्षक रंगकाम, स्पार्कल्स, टिकल्या, अॅक्रॅलिक कलर वापरून अतिशय आकर्षक मखरे तयार करण्यात आली आहेत. वजनाला हलकी असल्याने ग्राहकांची पसंती मिळत आहे