पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डुडुळगाव येथे पंतप्रधान आवास योजनेत गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. त्या प्रकल्पात एकूण 1 हजार 190 सदनिका उभारल्या जाणार आहेत. प्रकल्पाचा एकूण खर्च 168 कोटी असून, आता बांधकामाचा खर्च आणखी 1 कोटी 15 लाख 22 हजार रुपयांनी वाढला आहे.
महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेत चर्होली, बोर्हाडेवाडी, पिंपरी व आकुर्डी असे चार ठिकाणीचे गृहप्रकल्प पूर्ण करून लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप केले आहे. डुडुळगाव येथे आर्थिक दुर्बल घटकासाठी महापालिकेचा पाचवा गृहप्रकल्प उभारला जात आहे. ते 168 कोटी रूपये खर्चाचे काम गुजरातच्या शांती कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या ठेकेदार कंपनीस देण्यात आले आहे. ते काम 23 मे 2023 ला सुरु करण्यात आले आहे. कामाची मुदत अडीच वर्षे आहे. (Latest Pimpri News)
तेथे पार्किंग अधिक 15 मजली चार इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. एका मजल्यावर 16 सदनिका व एका इमारतीमध्ये 238 सदनिका असणार आहेत. त्यात पहिल्या मजल्यावरील सर्व सदनिका दिव्यांगांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. ते प्रमाण 5 टक्के इतके आहे. त्यामुळे पहिल्या मजल्यावरील सर्व सदनिकांमध्ये इंडियन टॉयलेटऐवजी कमोड टॉयलेट बसविण्याची सूचना स्थापत्य पंतप्रधान आवास प्रकल्प विभागाकडून करण्यात आली आहे.
प्रकल्प सल्लागार क्रिएशन्स इंजिनिअर्स प्रा. लि. यांनी इमारतीतील सदनिकेमदील किचनच्या खिडकीस व पॅसेजमध्ये लोखंडी ग्रिल्स बसविण्याची तसेच, बाल्कनी पॅसेजला तीन पाईप व कमोड बसवावेत. कमोडसाबेत जेट स्पे, हॅण्ड रेलिंग बसविले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त 1 कोटी 15 लाख 21 हजार 963 रूपये खर्च असल्याचा अभिप्राय दिला आहे.
निविदेत नसलेल्या जादा काम करण्यात येणार असल्याचे हा खर्च वाढल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे. त्या वाढीव खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
सदनिकांसाठी अर्जास प्रतिसाद
येथील एकूण 1 हजार 190 सदनिकांसाठी महापालिकेने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अर्ज मागविले होते. एका 323 चौरस फूट आकाराच्या सदनिकेची किमत 16 लाख 64 हजार 173 रूपये आहे. पात्र लाभार्थ्यास स्वहिस्सा म्हणून 14 लाख 14 हजार 173 रुपये भरावे लागणार आहेत. उर्वरित 2 लाख 50 हजार रुपये रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेने गेल्यावर्षी अर्ज मागविले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
विविध गटांसाठी सदनिका राखीव
या गृहप्रकल्पात एकूण 1 हजार 190 सदनिका आहेत. त्या सदनिका विविध वर्गासाठी राखीव करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण वर्गासाठी 595 सदनिका राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 155 सदनिका, अनुसूचित जमातीसाठी 83 सदनिका, इतर मागास (ओबीसी) वर्गासाठी 357 सदनिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दिव्यांगांसाठी 5 टक्के समांतर आरक्षण आहे.