पिंपरी: दिवाळीच्या सुटीत गावी जाण्यासाठी प्रवाशांची एस.टी.ला मोठी गर्दी झाली होती. वाढती गर्दी लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष गाड्यादेखील विविध मार्गांवर सोडण्यात आल्या होत्या. 16 ते 18 ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत साडेसात लाख प्रवाशांनी सहा हजार जादा गाड्यांतून प्रवास केला. यातून एस. टी. ला सहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात दोन कोटी 10 लाख रुपयांची वाढ झाल्याने लालपरी मालामाल झाली आहे. (Latest Pimpri chinchwad News)
नोकरी व कामानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक स्थायिक झालेले आहेत. सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी होती. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, दरवर्षी प्रमाणे यंदादेखील 15 ऑक्टोबरपासून विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. तसेच 16 ते 18 या तीन दिवसांत शिवाजीनगर, स्वारगेट आणि पिंपरी-चिंचवड आगारात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
दीपावलीनिमित्त गावी जाणाऱ्यांची गैरसुविधा होऊ नये, यासाठी अतिरिक्त कर्मचारी, नियंत्रण कक्ष व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या काळात प्रवाशांसाठी सहा हजार जादा फेऱ्या करण्यात आल्या. दीपावलीमधील महत्त्वाच्या तीन दिवसांत साडेसात लाख प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला.
विविध मार्गांवर धावल्या गाड्या
पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, जळगाव धुळे, धाराशिव, अकोला, सातारा, अमरावती, वर्धा, नादेंड, भंडारा, नागपूर, यवतमाळ, परभणी या मार्गावर एस.टी.च्या जादा गाड्या मार्गस्थ केल्या होत्या.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. या सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. एस.टी. महामंडळाची बसेसेवा ही सुरक्षित व सोयीस्कर असल्याने प्रवाशांनी एस.टी. गाड्यांना मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसून येते.अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे