पिंपरी : दिवाळीपूर्वी दोन-तीन दिवस आधी रेडिमेड फराळ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बचत गटाकडून आणि गृहिणी उद्योगातील महिलांनी तयार केलेले लाडू, चिवडा, चकली या फराळांच्या पदार्थाना या बाजारांध्ये चांगली मागणी राहते. सध्या या महिलांची दिवाळी फराळ बनविण्याची लगबग सुरु आहे.(Latest Pimpri chinchwad News)
एकीकडे नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना दिवाळीसणामध्ये फराळ बनविण्यास वेळ नसतो. त्यामुळे दिवाळीचा फराळ घरी बनविण्याऐवजी रेडिमेड फराळ खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे ज्या महिलांना घरची जबाबादरी सोडून बाहेर पडून काम करता येत नाही. ज्यांना उत्पन्नाचे काहीच साधन नाही. अशा महिलांसाठी दिवाळी हे अर्थार्जनाचे साधन झाले आहे. बऱ्याच गृहिणींना दिवाळीचे फराळ, आणि इतर वस्तू विक्रीतून रोजगार मिळत आहे.
बचत गटांबरोबरच शहरातील अनेक महिलाही दिवाळीपुरता हा व्यवसाय घरोघरी करतात आणि त्यांच्याकडील मागणीही दरवर्षी वाढत असल्याचा अनुभव आहे. विशेषत: घरगुती पद्धतीने तयार केलेल्या चकली, अनारसे अशा पदार्थाना तर मोठी मागणी असते. तयार फराळ खरेदी करण्यालाच प्राधान्य दिले जात असल्यामुळे अनेक महिलांसाठी दिवाळी फराळ तयार करून त्याची विक्री हे व्यवसायाचे साधन झाले आहे.
रेडिमेड फराळाला महागाईची झळ
दरवर्षी सणासुदीला फराळासाठी लागणाऱ्या तेल, साखर, रवा, बेसन, मैदा, तूप, हरबरा डाळ, खाबरे यांच्या भावामध्ये वाढ होत असते. त्यामुळे रेडिमेड फराळाच्या दरातही वाढ झालेली आहे.
चकली 650 रूपये, शंकरपाळे (गोड, खारे) 500 रूपये, चिवड 500 रूपये, बेसन लाडू 650 रूपये, रव्याचे लाडू 500 रूपये, अनारसे 650 रूपये, करंजी 650 - 700 रूपये.
अनेक नोकरदार महिला रेडिमेड फराळाला पसंती देतात. फराळाचे भाव दरवर्षी वाढतात यंदा देखील 10 ते 15 टक्क्यांनी दर वाढ झाली आहे. तूप, खोबरे, शेंगदाणे, तेल महाग झाले आहे. नेहमीच्या पारपंरिक फराळाबरोबर खाजे, पुडाच्या करंजी असे काही पदार्थ देखील बनविले जातात.अंकिता राऊत (रेडिमेड फराळ विक्रेत्या)
आम्ही दिवाळी सणापुरता फराळाचा व्यवसाय करतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही फराळ तयार करण्याचे काम सुरु आहे. दरवर्षी फराळासाठी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.सुनीता बोडके (गृहिणी)