Diwali Ready Made Faral Pudhari
पिंपरी चिंचवड

Diwali Ready Made Faral: दिवाळीत रेडिमेड फराळाला वाढती पसंती; वेळेअभावी तयार पदार्थांच्या खरेदीकडे कल

चिंचवड बाजारपेठेत खरेदीचा उत्साह

पुढारी वृत्तसेवा

चिंचवड: दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी बाजारपेठांमध्ये फराळाच्या खरेदीला वेग आला आहे. घराघरांत दिवाळीची तयारी सुरू आहे. परंतु, बहुतांश घरांत स्‍त्री-पुरुष नोकरी, व्यवसाय करत असल्याने वेळेअभावी नागरिकांचा कल रेडिमेड फराळ खरेदी करण्याकडे वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पारंपरिक चवीचा फराळ आकर्षक पॅकिंग आणि विविध प्रकारची उपलब्धता यामुळे तयार फराळाला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

दिवाळी म्हटले की चिवडा, चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे, शेव, अनारसे अशा पारंपरिक पदार्थांची रेलचेल असते. मात्र, बदलती जीवनशैली, नोकरी- व्यवसायाची धावपळ आणि सणांच्या इतर कामांमुळे घरी फराळ बनवण्यासाठी वेळ काढणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या रेडिमेड फराळाच्या पदार्थांना मागणी वाढत आहे.

पारंपरिक चवीला ग्राहकांची पसंती

फराळ विक्रेत्यांकडून विविध प्रकारचे गोड आणि तिखट पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्राहकांना आवडीनुसार फराळ निवडता यावा, यासाठी सुट्या पदार्थांसह एकत्रित फराळांचे बॉक्सही विक्रीस ठेवण्यात आले आहेत. विशेषतः नातेवाईक, मित्रमंडळी यांना दिवाळीच्या शुभेच्छांसह फराळ भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंगमधील पदार्थांची खरेदी केली जात आहे.

गृहिणींची धावपळ कमी

दिवाळीच्या साफसफाईपासून पूजा साहित्याची खरेदी आणि पाहुण्यांच्या स्वागतापर्यंत अनेक कामांची लगबग सुरू असते. अशा परिस्थितीत रेडिमेड फराळामुळे वेळेची बचत होत असून, सणांचा आनंद घेणे अधिक सोयीचे होत आहे. घरगुती चवीचे आणि दर्जेदार पदार्थ मिळत असल्याने ग्राहक तयार फराळाला पसंती देत आहेत.

दिवाळी जवळ येताच रेडिमेड फराळाच्या खरेदीला गर्दी वाढू लागली आहे. चिवडा, चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, शेव अशा पारंपरिक पदार्थांना विशेष मागणी आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे घरी फराळ बनवण्याऐवजी तयार फराळ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.
- फरसाण विक्रेते.
कामांची मोठी धावपळ असते. त्यामुळे सर्व प्रकारचा फराळ घरी बनवणे शक्य होत नाही. बाजारात विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ उपलब्ध असल्याने आम्ही रेडिमेड फराळ खरेदीला प्राधान्य देतो. वेळेची बचत होते आणि आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी मिळतात. त्यामुळे दिवाळीची तयारी अधिक सोपी होत आहे.
- गृहिणी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT