नवलाख उंबरे: यावर्षी पावसाने नाा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवात नागरिकांना बाहेर फिरण्याचे कठीण केले होते. त्यानंतर बरेच दिवस पावसाने सुट्टी घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडून दिवाळी जोरात साजरी करायचे ठरविले असता पावसाने पुन्हा एकदा नागरिकांच्या आनंदावर पाणी सोडले आहे. यंदा आम्ही सण, उत्सव साजरा करू का नको, असा प्रश्न नागरिक करत आहेत. (Latest Pimpri chinchwad News)
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना, बाजारपेठा आणि खरेदीत नागरिक रमले असतानाच पावसाने अचानक हजेरी लावून सर्वांच्या आनंदावर विरजण टाकले. काही वेळ ढगाळ वातावरण ठेवून थोडेफार भीती दाखविल्यानंतर पावसाच्या सरींनी नागरिकांना घरातच बसविले. लहान मुलांचे दिवाळीचे आनंदमहाल कोसळलेच म्हणावे, कारण फटाके वाजविण्याऐवजी आता आम्ही काय घरातच फटाके वाजवू का, असा गमतीशीर प्रश्न त्यांनी पावसालाच केला.
याआधीही गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात पावसाने नागरिकांना हैराण केले होते. त्याच मालिकेचा पुढचा भाग जणू लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाहायला मिळाला. सकाळपासून गजबजलेल्या रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये दुपारी काही क्षणातच ओस पडल्याचे चित्र होते. तरीही काही ठिकाणी पावसाचा आनंद घेत नागरिकांनी छत्रीखाली खरेदी सुरू ठेवली. काहींनी तर पावसासोबतच दिवाळीचा आनंदही द्विगुणित झाला, असे म्हणत प्रसन्न चेहऱ्याने सण साजरा केला.
संपूर्ण आठवडाभर बाजारात गर्दी होती. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच पाऊस येतो. पावसामुळे ग्राहक थोडे कमी आले, पण जे आले त्यांनी ओलेचिंब होऊनही खरेदी केली.नितीन दगडे, इंदोरी, स्थानिक दुकानदार.
लोणावळा शहरामध्ये ऐन दिवाळीत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आकाशामध्ये काळ्या ढगांची दाटी होऊ लागली व अचानक ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
सुमारे तासभर हा पाऊस जोरदार सुरू होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटामुळे व पावसामुळे अनेक वेळा लाईट जाण्याचे प्रकार देखील घडले. नवरात्र उत्सव काळामध्ये लोणावळा शहरामध्ये दररोज पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाने उघडीप घेतली होती. आज मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारीच पावसाने लोणावळा शहर व परिसरामध्ये जोरदार हजेरी लावली.
ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट व जोराचा पाऊस यामुळे नागरिकांचे हाल झाले. दिवाळी सणाच्या निमित्त बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नागरिक आले होते. लक्ष्मीपूजन असल्यामुळे हार व फुलविक्रेते यांनी देखील रस्त्यावर दुकाने थाटली होती तर फटाके घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. या सर्वांनाच जोरदार पावसाचा फटका बसला आहे. व्यावसायिकांचे देखील मोठे नुकसान झाले.
शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण
ग्रामीण भागामध्ये भात कापणीची कामे सुरू झाली आहेत. ऐन भात कापण्याच्या वेळेलाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यावर्षी मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भात रोपांची पेरणी करता आली नव्हती. ज्यांची पेरणी झाली व भात काढण्यासाठी आले त्यावेळी पुन्हा पावसाने सुरुवात केल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून, यामुळे मोठे नुकसान देखील होणार आहे.