पिंपरी: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, घरोघरी गृहिणींची फराळाचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरु झाली आहे. दिवाळी म्हटले की, विविध गोड पदार्थांना विशेष मागणी असते. त्यासाठी आवश्यक सुक्यामेव्यालाही मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.
दिवाळी सणात विविध खाद्य पदार्थांची मोठी रेलचेल असते. सणात नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना घरी फराळासाठी घरी बोलावले जाते. यासाठी विशेष प्रकारची मिठाईदेखील तयार केली जाते. त्यासाठी लागणाऱ्या सुक्यामेव्याची खरेदी करण्याची गृहिणींची लगबग दिसून येत आहे; विविध प्रकारचे लाडू, करंजी तसेच इतर गोड पदार्थात आवर्जुन मनुका, बेदाणे तसेच जर्दाळू व पिस्ते यांचा वापर केला जातो.
हे सुक्यामेव्याचे पदार्थ वापरल्याने दिवाळीच्या गोड फराळाची लज्जत आणखी वाढते. तसेच दिवाळीमध्ये अनेकजण विशेष करून सुक्यामेव्याचे बॉक्स एकमेकांना भेट दिले जातात. त्यामुळे या पदार्थांना वाढती मागणी असल्याचे दिसून येत आहे.