पिंपरी : वृद्ध वडिलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी टाळत तसेच त्यांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काटे वस्ती, दिघी येथे घडली. राजेंद्र गणपत काची (57, रा. जुने काटे वस्ती, हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.
गणपत लक्ष्मण काची (82, रा. जुने काटे वस्ती, हवेली, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि. 1) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 2020 ते 1 डिसेंबर 2025 या कालावधीत काटेवस्ती, दिघी येथे घडली. सन 2020 पासून आरोपी मुलगा फिर्यादीच्या दोन गुंठे जागेवरील घरात राहत असून वडिलांचा खर्च न बघता त्यांना दुसऱ्यांकडून अन्न मागण्याची वेळ आणली.
तसेच फिर्यादींचे पुण्यातील दुकान स्वतःच्या नावावर करून घेतले. प्रशासनाने दरमहा पाच हजार रुपये देण्याचा आदेश दिल्यानंतरही ती रक्कम देण्यास नकार देत फिर्यादींच्या 25 लाखांच्या मालावर ताबा घेतल्याचे समोर आले आहे.