पिंपरी : विवेकनगर, आकुर्डी येथील एका हाऊसिंग सोसायटीतील एकाच कुटुंबातील तीन जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. ते खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. ही बाब समोर आल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागी झाली आहे. महापालिकेच्या पथकाने सोसायटीच्या आवारात तपासणी मोहिम राबवून डेंग्यूच्या अळ्या नष्ट करून औषध फवारणी केली आहे. तसेच, संबंधित सोसायटीला 10 हजारांचा दंड केल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
विवेकनगर येथील एकाच घरातील तिघांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. ते रुग्ण सद्यस्थितीत डेंग्यू संशयित आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांचा चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त नाही. वैद्यकीय विभागामार्फत त्या परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. सोसायटीच्या शेजारील बांधकाम साईट येथे डेंग्यू आजारास कारणीभूत असलेल्या डासांच्या अळया आढळून आल्या आहेत. या ठिकाणी औषध फवारणी करुन डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट केली आहेत. बांधकाम साईटकडून 10 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे, असे दावा पालिकेने केला आहे.
दरम्यान, शहरात डेंग्यू आजाराच्या निदानासाठी एकूण 3 हजार 2 संशयित रुग्णांचे प्लेटलेट नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यामध्ये डेंग्यू आजाराचे 23 रुग्ण आढळून आले आहेत.
रूग्ण आढळून आलेल्या सोसायटीच्या गच्चीवर पावसाचे पाणी साचले होते. त्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत, असे सोसायटीतील रहिवाशांना सांगितले.
त्या तिघा रूग्णांचा अद्याप डेंग्यूचा चाचणी अहवाल प्राप्त झालेला नाही. ते रुग्ण सद्यस्थितीत डेंग्यू संशयित असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
एकाच घरातील पाच जणांना डेंगी लागण झाली आहे. सत्तर वर्षांचे दोन ज्येष्ठ नागरिक आहेत. 25 ते 30 वर्षे वयोगटांचे तीन जण आहेत. त्यातील तिघे जण गेल्या तीन दिवसांपासून रूग्णालयात दाखल आहेत. तर, दोघे घरीच उपचार घेत आहेत. घरातील बहुतेकांना डेंग्यूची लक्षण दिसत असल्याने लहान मुलांना आजार होईल म्हणून आम्ही पालिकेकडे तक्रार केली. महापालिकेने घरोघरी तसेच, आजूबाजूला तपासणी करून डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करावीत. औषध फवारणी करावी. पालिका प्रशासन सुस्त असल्याचे दिसत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते इकलास सय्यद यांनी सांगितले.
डेंगी या आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या रुग्णालयातून औषधोपचार व सल्ला घ्यावा. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी व सांधेदुखी, उलट्या होणे, डोळयांच्या आतील बाजुस दुखणे, अंगावर पुरळ, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, त्वचेखाली, नाकातून रक्तस्त्राव होणे, रक्ताची उलटी होणे, रक्तमिश्रीत किंवा काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे, प्लेटलेटचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अत्यवस्थ होणे. रुग्ण बेशुध्द होऊ शकतो. यामध्ये मृत्युचे प्रमाण जास्त असते.
हा आजार डास चावल्याने होतो. यामुळे आपले घर व नजीकच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. याकामी घरात व आजुबाजुच्या परिसरात पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. घरातील कचर्याची व टाकाऊ वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. आपल्याला डास चावणार नाहीत याची वैयक्तिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.