Dengue disease is currently on the rise in the city
शहरामध्ये डेंग्यू आजाराने सध्या डोके वर काढले आहे 
पिंपरी चिंचवड

Dengue News | शहरामध्ये डेंग्यूचा डंख

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : शहरामध्ये डेंग्यू आजाराने सध्या डोके वर काढले आहे. 1 जूनपासून आत्तापर्यंत 5 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, 863 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

शहरामध्ये जून महिना अखेरीस 3 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली. तर, जुलै महिन्यात गेल्या दोन दिवसांमध्ये नव्याने 2 बाधित रुग्ण आढळले आहेत. पिंपळे सौदागर आणि मोशी येथील हे रुग्ण आहेत. 5 बाधित रुग्णांपैकी 4 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे त्यांना रूग्णालयातून घरी सोडले आहे. एक रुग्ण खासगी रुग्णालयत उपचार घेत आहे.

वर्षाच्या सुरुवातीपासून डेंग्यूची साथ

जानेवारी महिन्यापासून डेंग्यू संशयित रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. जानेवारीमध्ये 311 संशयित रुग्ण होते. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात संशयित रुग्णांची संख्या घटत गेली. मे महिन्यापासून पुन्हा संशयित रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. मे महिन्यात 225, जूनमध्ये 741 तर, जुलै महिन्यात गेल्या दोन दिवसांमध्ये 122 संशयित रुग्णांची नोंद झाली; मात्र शहरातील खासगी रूग्णालयांत या आजाराचे किती रूग्ण उपचार घेत आहेत, याविषयी माहिती उपलब्ध होवू शकत नाही.

हे करा

एडिस इजिप्ताय डासांची पैदास रोखण्यासाठी सर्व पाण्याच्या टाक्या आणि कंटेनर झाकणाने घट्ट झाकून ठेवा. डेंग्यू डासांची पैदास रोखण्यासाठी दर आठवड्याला कुलर , फ्रीज खालील ट्रेमधील पाणी रिकामे करावे. डासांचा प्रवेश रोखण्यासाठी दारे आणि खिडक्यांना जाळी लावावी. सर्व न वापरलेले कंटेनर, रद्दीचे साहित्य, टायर, नारळाच्या करवंट्या आदींची योग्य विल्हेवाट लावावी. डेंग्यू डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फुलदाणीतील, कुंड्यांतील पाणी दर आठवड्याला बदलावे. एक आठवड्यापेक्षा जास्त काळ घर बंद ठेवणार असाल तर टॉयलेट सीट झाकून ठेवावे.

डास चावण्यापासून वाचण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे. एडिस डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी मॉस्किटो रिप्लेसंट वापरावे. डेंग्यू तापाच्या वेळी डास चावण्यापासून रोखण्यासाठी घरी आणि रुग्णालयात बेडनेट वापरावे.

दिवसा एरोसोल, व्हेपोरायझर्स (कॉइल/मॅट्स) वापरावे. ताप आल्यास पॅरासिटामॉल, भरपूर द्रव पदार्थ घ्यावे. विश्रांती घ्यावी. घरातील पाणी साठविण्याच्या सर्व भांडयातील पाणी वापरुन ती रिकामी करुन कोरडी करावी. त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावे. घराभोवती पाण्याची डबकी असतील तर ती बुजवा किंवा सदर ठिकाणी पाणी वाहते केले जाईल, याची दक्षता घ्यावी. शौचालय आणि ड्रेनेजच्या व्हेंन्ट पाईपला जाळया बसवाव्या.

लक्षणे

  • तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी व सांधेदुखी

  • उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे

  • अंगावर पुरळ, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे

  • त्वचेखाली, नाकातून रक्तस्राव होणे व रक्ताची उलटी होणे, रक्तमिश्रित / काळसर रंगाची

  • शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे, हातपाय थंड पडणे.

  • काही रुग्णांमध्ये यादरम्यान रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अत्यवस्थ होतो. तसेच, बेशुध्द होऊ शकतो. या गंभीर बेशुध्दावस्थेला डेंग्यू शॉक सिंड्रोम असे म्हणतात. त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते.

डेंग्यू आजाराची लक्षणे आढळून येताच नागरिकांनी नजीकच्या महापालिका रुग्णालयातून औषधोपचार व सल्ला घ्यावा. डेंग्यू तापाच्या बाबतीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह धरू नये. डेंग्यूच्या अनेक रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज नसते.
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी
SCROLL FOR NEXT